Thursday, May 7, 2015

मनीच्या कथा ७

एखाद्यानं वागण्या-बोलण्यातून कधी दुखावलं असेल आपलं मन तर आपण कायम नंतर त्याच्या प्रत्येक कृतीत ती इतरांना दुखावणारी वृत्तीच शोधत बसतो. कुणी खोटं बोललं असं आढळून आलं तर त्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रत्येक विधानाला खऱ्या-खोट्याच्या पारड्यामध्ये बसवतो आपण. तो चुकला होता, हे कधीच विसरू शकत नाही आपण. त्याच्या पुन्हा चुका करणं थांबल्यावरही आपण त्याला मात्र स्वच्छ पाहूच शकत नाही. त्याच्या वागण्याने कधीतरी पोळलो गेलोय, आता पुन्हा जीभ भाजून घ्यायची नाही आणि म्हणून सगळ्या आतल्या जाणीवानिशी आपण रेट्याने त्या कधीतरी दुःख दिलेल्याला आपल्या कक्षेच्या बाहेरच ठेवतो. 
तिचे पुन्हा परत जाणे आणि स्वतःच्या चुकांच्या कबुलीजबाबानिशी जाणे याच्या वाट्याला मानवी स्वभावातील वरील सगळ्या गोष्टींचे भोग होते. आणि त्यामुळेच तिचे जाणे कठीण वाटत होते तिला. इथे पुन्हा प्रश्न निर्माण झाला होता, काय करावे, हा. पुन्हा तिचा स्वतःचा एक प्रवास आतल्या आत सुरु झाला होता. 
"मी… एक व्यक्ती म्हणून माझ्यातील गुण-दोषांसकट इतरांद्वारे स्वीकारली जावी हि एक अपेक्षा घेऊन जगते आहे का? आज मी माझ्यातील सर्व बाबींचा विचार करून स्वतःतील वैगुण्य अगदी स्वच्छपणे स्वीकारले आहे. पण ते इतरांनी का स्वीकारावे? माझ्या वागण्याचा, बोलण्याचा त्यांना जो त्रास झाला ते सारे त्यांनी का विसरावे? मला पुन्हा स्वीकारताना त्यांच्या मनावरचे ओरखडे जे केवळ माझ्यामुळे उठले आहेत, ते जातील? का मला पाहून त्या जखमा पुन्हा वाहू लागतील?
मी … मला जायला हवे कारण मला मनापासून त्या एका व्यक्तीबद्दल काही विशिष्ट भावना आहेत ज्याचा मी लाईफ पार्टनर म्हणून स्वीकार केला आहे. मला परत जायला आवडेल त्याच्याकडे. आणि माझ्या बाळालाही. खरे तर आमच्या या मोठ्यांच्या खोट्या, आडमुठ्या, रुसव्या-फुगाव्यांच्या आणि कुजक्या अपेक्षांच्या दुनियेत त्या निष्पाप जीवाचा काहीही दोष नसताना त्याला शिक्षा का? त्याला हवेत तेच लोक ज्यांच्याबद्दल माझे एक वेगळे मत आहे. मग मी माझा निर्णय त्याच्यावर का लादावा? त्याला वडिल हवे असतील तर? मी त्याच्यावतीने निर्णय का घ्यावे?"
आणि इथे तो तिच्या मदतीला धावून आला. तिच्या आतल्या प्रवासाची किंचितशीही जाणीव नसताना अचानक त्याने तिला हाक मारली आणि परत चल, म्हणाला. त्यालाही त्याची चूक उमगली होती? का तिचे परतणे त्याच्या मदतीशिवाय शक्य नाही, हे त्याला कळले होते? कारण कुठलेही असो. पण तो तिला परत चल म्हणाला. आणि परत जाण्याआधी तो तिच्याशी बोलणार होता. सारे काही आणि अगदी स्पष्ट व खरे. 
कदाचित त्या संवादातूनच तिच्या परतीची वाट सुकर होणार होती. 
(क्रमशः)
वर्षा वेलणकर 

Saturday, April 25, 2015

वाचन

दिवसच्या दिवस जातो कधी कधी वाचण्यात तिचा… त्यात फक्त अक्षरंच नसतात… कधी हातातला कणकेचा उंडा असतो, पोळपाटावरची गोल होत गेलेली पोळी असते तर कधी तव्यावर विस्तवाच्या सहवासाने मिळालेले चटके अंगावर घेऊन टम्म फुललेली चपाती असते… तिलाही आला असेल का विस्तवाचा राग? तिच्या अस्तित्वाला पूर्णत्व नाही त्याच्याशिवाय हे सत्य आहे की एक बनाव? सत्य असेल तरी आता हे रोजचे जीवघेणे भाजून घेणे नको असेल तिला तर? तोच जाळ, तेच चटके, ते स्वतःचे धुमसत जाणे, अगदी दोन्ही अंगांनी चिकटणाऱ्या यातना… नकोश्या झाल्या असतील तिला तर? हे सगळे पुर्णत्वाकडे नेणारे असले तरीही नकोच असेल तिला तर? पूर्णत्वच नको असेल तर? 
दिवसच्या दिवस जातो असा वाचण्यात… तेलात तडतडणारी मोहरी आणि गळ्यातल्या काळ्या मण्याची दोरी… मोहरीचा दाणा फुटून हातावर येतो तेव्हा गळ्यातला त्या काळ्या मण्यांच्या फासाला सणकन एक हिसडा द्यावा आणि फेकून द्यावे… स्वतःला वाचताना ती हे कित्येकदा मोठ्याने उद्गारली देखील… "एवढं इनटेन्स कुठल्या पुस्तकात आहे?" म्हणून विचारणा होते… 
मग ती वाचत सुटते दिवसच्या दिवस… हे वाक्य उच्चारणाऱ्या पेपराआड दडलेल्या चेहऱ्याला… पेपर असतो मधे, चष्म्याच्या दोन काचा असतात आणि बुबुळांवर अर्ध्यापर्यंत उतरलेल्या पापण्या असतात… पण वाचत जाते ती… वाचावेच लागते… वाचले नाही तर ती वाचणार कशी? शरीर जगवायला हवा, पाणी, अन्न लागतं आणि शरीर का जगवतो आहे या प्रश्नाचे उत्तरही लागते… ते कुठे शोधायचे? 
मग ती तत्वज्ञान वाचते… दिवसच्या दिवस… एका व्यक्तीच्या जन्माला येण्याचे कारण काय, हे ज्ञान ज्याने मिळवले आहे त्याचे शब्द ती वाचते. कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नसते, या वाक्यावर अडखळायला होतं तिला… मग पूर्ण कसे व्हावे, हे वाचते. आणखी एक अपूर्ण व्यक्ती तुम्हाला पूर्ण करते, हे वाचूनच तर तिने निर्णय घेतला होता… पण ते अपूर्णत्व आता फक्त तिच्या एकटीच्या मालकीचे आहे, हे सिद्ध करणारी कित्येक विधाने ती गेल्या अनेक वर्षांच्या, अनेक दिवसांच्या, अनेक क्षणांमध्ये हर घडी वाचत आली आहे. तिच्या भोवताली म्हणे अपूर्ण असे काही आणि कुणीच नाही. हे त्या सभोवतालच्या चेहऱ्यांवर ती वाचते. 
वाचतेच तर आहे ती दिवसच्या दिवस… तिचे अंतरंग… तिथे ठसठशीत प्रश्नार्थक चिन्हांची गर्दी आहे, हे तिला वाचूनच तर कळले… पूर्वी प्रश्नार्थक चिन्हे पाहून, उद्गारवाचक चिन्हाला असे अर्ध वर्तुळ कुणी दिले शिरावर? चुकले असेल लिहिताना, असंही तिला वाटायचे… पण हळूहळू तिला त्यातील फरक कळला… मग ती वाचत राहिली… आता कधी कधी तिला भानच राहत नाही आणि मग काळीज स्वतःचे उलटे कधी झाले हे न कळून ती वाचत राहते दिवसच्या दिवस… ठसठशीत प्रश्नार्थक चिन्हे उलटी दिसतात तिला… एखाद्या हुक सारखी ती लटकलेली असतात उलट्या काळजाला… 

वर्षा वेलणकर 

Tuesday, April 21, 2015

कथा

"किती काही उरतं तासनतास बोलून झाल्यावरही! एक तरी शब्द वापरायचा राहूनच जातो घडाभर वर्णन केल्यावर. दिवसाच्या घडामोडींचा आढावा घेऊन होतो. त्यावर उमटलेले राग-लोभाचे गिळलेले आवंढे ओकून होतात. प्रेम बोलून होतं, जिव्हाळा व्यक्त करून होतो. त्यात बेमालूम विणलेल्या असूयेचा, अप्रामाणिकतेचा एक धागा ही लपवून ठेवल्या जातो. पण तरीही राहतच काहीतरी अव्यक्त. भर दुपारी भरून आलेल्या आभाळाच्या पाठच्या सूर्याची किरणं जशी कातडीवर पडत नाही तसं काहीतरी आत असूनही ओठावर येत नाही. शब्द साथ देईनासे होतात. वाळून कडकडीत झालेली सुबाभळीची शेंग तटकन टिचकते तसं काहीसं आत टीचकत राहतं. कान देऊन ऐकलं तर आवाजही होतो त्याचा. पण तटतटून फुटतानाचा क्षण शब्दात मांडताच येत नाही. हि अशी कशी अवस्था असते … कण कण भोगूनही सांगताच न येणारी? पराकोटीची अगतिकता ती हिच का?"  

किचनमधल्या ओटाभर पसरलेल्या भांड्यात तिचं हे असं अस्ताव्यस्त हरवल्यासारखं बोलत सुटणं तसं नवीनच. तिची घुसमट हातातल्या घासणीनं भांड्यांवर आणि ऐकणाऱ्याच्या मनावर ओरखडे उमटवणारी. प्रश्न इतरांना उद्देशून असले तरी उत्तरं तिची तिलाच ठाऊक असतात. मग ती पुढे बोलत सुटते. एकीकडे भांडी लख्ख होतात आणि पसारा आवरल्या जातो. तीही बोलून बोलून आवरत सावरत जाते. कामात गुंतलेले हात आणि तोंडभर शब्द. ती हि अशीच भेटत सुटते सगळ्यांना. किंबहुना इतरच भेटतात तिला. वारंवार. आणि आलेल्यांकडे ढुंकूनही न पाहता ती फक्त बोलत असते. तिच्या कामाबद्दल आणि त्या कामासंदर्भात इतरांकडून असलेल्या अपेक्षांबद्दल किंवा मदती बद्दल. क्वचित कधी कुणी तिच्याबद्दल विचारलाच तर ती सांगतेच. हातच काहीही राखून न ठेवता.
"शाळेत असतानाच माय-बाप गेले आणि त्यानंतर आश्रम शाळेच्या छपराखाली आणखी खुरटी होत गेले."
"वाढत गेले म्हणायचं असेल का हिला?" इतका बावळट प्रश्न विचारणारे कुणी भेटलेच तर ती तिची कथा पुढे ऐकवते.
"कधी पाहिलीत का आश्रम शाळा? कुणाला वाढताना पाहिलं आहे शाळेच्या चार भिंतीत? शाळेत मिळालीच तर फक्त माहिती मिळत राहते. Only information. You earn knowledge when you are out of those walls. बाहेरचं हे जे जग आहे न त्यात खऱ्या परीक्षा द्याव्या लागतात. तुम्हाला बरं असतं  २१ अपेक्षित आयते मिळतात. आम्हाला तर syllabus पण देत नाही कुणी."
बोलताना तिच्या अश्या घसरण्याचीही आता इतरांना सवय झाली आहे. पण ते बोलणे आपल्याला उद्देशून नाही, हे न समजण्या इतके बावळट लोक तिच्या वाट्याला आलेले नाहीत. पण क्षणात कणखर, स्पष्ट असणारी ती इतकी अगतिक का होते, याचा अंदाज घेणं कठीण होतं. ती पसारा हातावेगळा करते आणि तिला  ऐकणारे तिच्या अशा असंबद्ध बोलण्याच्या संदर्भ शोधाच्या गुंत्यात गुंतत जातात. 
"हि अगदी पुस्तकातल्या सारखं बोलते आहे, नाही का? एखाद्या आर्ट फिल्म मधला संवाद शोभेल इतकं परफेक्ट. आपणच हे सारे लिहून घ्यावे आणि तिची गोष्टही लिहावी. दिवाळी अंकाला पाठवली तर नक्की छापल्या जाईल." असं काहीसं खूप creative आणि उद्दात्त वगैरे ऐकणाऱ्याच्या मनात फुलत जातं. तिची कहाणी इतरांना सांगावी, यावर तुम्ही ठामपणे निर्णय घेता. या विचारांनी थांबलेले श्वसन एक मोठ्ठा श्वास घेत पुढे सुरु होते. तिचे बडबडणे आणि कामात गडबडणे सुरु असतानाच तिच्या तुम्ही लिहू घातलेल्या कथेतील वाक्य डोळ्यापुढे नाचू लागतात आणि तुम्ही नकळत तिच्या पलीकडे पाहू लागता. शून्यात पाहिल्या सारखे. तिच्या जीवनाचा तो जो काय आलेख वगैरे असतो त्याची मांडणी तुम्ही करू लागता.
एका संस्थेत निराधार स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळवून देण्याचं काम ती गेली अनेक वर्ष करते आहे. स्वतःवरील निराधाराचा शिक्का पुसून तिला बरीच वर्ष झाली आहेत तशी. म्हणून ती असे शिक्के घेऊन जगणाऱ्यांच्या मदतीला धावून जाते. रस्त्यावर, कचराकुंडीत, नाल्यात, रेल्वे स्टेशनवर आणि वाट्टेल तिथे तिलाच कसे काय असे निराधार भेटतात कुणास ठाऊक. "कदाचित स्वजातीय म्हणून ते माझ्या मागावर असले पाहिजेत. वास लागत असेल माझा."
पण तिचा खरा त्रास काही वेगळाच आहे. तिच्या तोंडाचा पट्टा सुटण्याचे कारणही वेगळेच आहे.
"नकोसे झालात तुम्ही आम्हाला. म्हणून चिडचिड होते आहे माझी," ती एकदम उद्गारते.
"काय केलं आम्ही?" पुन्हा एक बावळट प्रश्न असतोच तिच्यासाठी.
"आमच्यासारख्या ज्या इतरांच्या आधाराची गरज असलेल्या व्यक्ती आहेत न त्यांना आता नकोसे वाटू लागले आहेत तुमचे आधार. सतत पांगळेपणा कुणाला हवा असतो? पण तुम्ही मदत करणारे सतत इतके जवळ असता कि आपल्या दुबळेपणाची आणि असहाय असल्याची सतत जाणीव होत राहते. हे तुम्ही असे निराधार लोकांना मदत करणारे आणि त्याच्या संस्था चालवणारे. पोटं भरताहात सगळी स्वतःची. कुणी आपल्या तथाकथित सामाजिक जबाबदारीची कारणं पुढे करत स्वतःसाठी एक प्रतिष्ठा मिळवता आहात तुम्ही. तुम्ही आमच्यासारख्यांना जेव्हा मदत करायला सरसावता ना तेव्हा आसूडाचे फटकारे बसतात मनावर. आपले संपूर्ण जगणेच असे कुणाच्या तरी आधाराने असण्यापेक्षा मृत्यू जवळ करावासा वाटतो. पण तुम्ही नाही मरू देणार आम्हाला. कारण आमचे जाणेही तुमच्या प्रतिष्ठेला धुळीस मिळवणारे आहे. आम्ही बांडगुळा सारखे जगलो नाही तर तुमच्यावर सतत आरोप होतील. म्हणून तगवून ठेवले आहे तुम्ही आम्हाला.
"आम्ही अनुभव पुरवतो तुम्हाला. आयुष्यात काय करू नये आणि काय वाट्याला येऊ नये याची जिवंत उदाहरणे आहोत आम्ही. आमच्या दुःखाची लक्तरं वेशीवर टांगून तुम्ही सत्काराच्या शाली मिळवता. मला नाही पसंत हे. खबरदार माझी कथा करून विकलीस कुठल्या मासिकाला तर! मी अगतिक नाही. निराधार नाही आणि माझे आयुष्य विकाऊ नाही."
आता तिची कथा पूर्ण होते. ती नायिका असलेली तिची कथा! तिच्याच शब्दात! 

वर्षा वेलणकर 

Friday, April 17, 2015

मनीच्या कथा ६

ती परत स्वतःच्या अस्तीवाच्या कक्षेत परत आली. तिचे स्वतःचे वर्तुळ आकाराने छोटे होते. आणि त्या छोट्या जागेत गरगर फिरताना भोवळ येतेच. स्वतःचेच असणे स्वतःला बोचू लागते. आपण जसे आहोत तसे का, या एका प्रश्नाने सोलवटून निघणेही अटळ असते. कारण स्वतःला जोखणे एक तर फार कठीण आणि ते एकदा सुरु झाले कि मग आपण स्वतःच्याच अंतरंगात धारदार शस्त्रानिशी घुसत जातो. अशा स्वतःच्या स्वतःवरील शस्त्रक्रिया म्हणजे अवघड काम असतं. पण त्याला पर्यायही नसतो. 
स्वतःच्या कक्षेत परत आली खरी, पण तिला हे अवघड काम जमेना. कारण आता तिला तिचे सारे 'चुकलेले' दिसू लागले. शिवाय चूक किंवा बरोबर असे काही नसते ग बाई, हे सांगणारेही कुणी नव्हते कारण ती कुणाशी याविषयी बोललीही नव्हती. इतरांना लावलेली फुटपट्टी आपण स्वतःला लावून पहिली की मग खरा हा अतरंगी 'अंतरंगाचा' प्रवास सुरु होतो. "ज्या गोष्टीसाठी त्याला बोल लावला तीच गोष्ट माझ्या हातून घडली. मग मी चुकले. जे मला कधीच नको होते ते त्याला करायला भाग पाडले. मी चुकले. आणि आता या सगळ्या चुका मान्य झाल्या आहेत तर दुरुस्त करायला परत जायचे?"
परतीचे प्रवास खूप अवघड असतात. त्यातही, आता कधीच परतायचे नाही, असे ठरवून/सांगून गेल्यानंतर तर हा प्रवास अशक्य वाटतो. "आपण आपलाच शब्द मोडायचा? परत जायचं? ज्यांना, परत येणार नाही, हे सांगितले होते त्यांच्यासमोर जाऊन उभं राहायचं? काय म्हणतील ते? आपण आपल्या चुका कबूल केल्या म्हणून आपल्याला पराभूत ठरवतील ते आणि मग आपला फायदा  उठवतील. मग कसे होणार आपले? कुठले तोंड घेऊन आपण यानंतर त्यांच्या चुकांवर बोट ठेवायचे? ते ही आपण चुका केलेल्या असताना?"
मन हे तलवारी सारखं असतं. दोन्हीकडे धार असणाऱ्या तलवारीसारखं. ते कापत सुटतं तुम्हाला. आणि खरंच आणखी एक व्यक्ती आपल्यात सहभागी असेल तर, ती आपल्याबद्दल काय विचार करेल, या विचारांनी आपण स्वतःला खूप जखमा करून घेतो. आपण काय विचार करतोय आणि तो योग्य की अयोग्य यापेक्षा तो स्वतःला पूर्णतः पटला आहे अथवा नाही किंवा मान्य आहे अथवा नाही, असा विचार करून कुठलाही निर्णय घेण्याऐवजी आपण असा कुठलाही निर्णय घेतल्यावर इतरांची त्यावर प्रतिक्रिया काय असणार याचाच जास्त विचार करतो. मग सगळा मामला बिघडतो. आपण स्वतःच्याच विचारांनी परिपूर्ण नसताना इतरांचेही विचार आपण करायचे आणि ते असेच वागतील, बोलतील, करतील असे एकांगी निर्णय घेत स्वतःच्या निर्णयांची गळचेपी करायची? किती योग्य आहे हे?
आपल्यासाठी आवश्यक असलेला विचार आपण करून, त्याचे विश्लेषण करून आणि मग तो स्वतःला योग्य वाटत असल्यास त्याचा पूर्ण स्वीकार करून कुठलीही कृती करणे आवश्यक असताना आपण फक्त आणि फक्त इतरांच्या संभावित विचारांचे ओझे स्वतःच्या डोक्यावर वाहतो. मी माझी कृती योग्य आहे आणि मी त्यावर ठाम आहे, हे सांगण्या ऐवजी आपण ती कृती केली तर इतर काय म्हणतील, याचा विचार आधी करतो आणि मग त्या अनुशंघाने निर्णय घेतो. मग असा निर्णय स्वतःचा आहे, असे म्हणता येईल का? 
तिचा आता गोंधळ उडाला होता. काय घडलं, कुठे बिनसलं आणि त्यात कुणी काय केले हे तिला कळले होते आणि म्हणून तिला परत जावेच लागणार होते. पण आता परत जाताना मात्र तिला पायात मणभर वजनाचे दगड बांधल्यासारखे झाले होते. तिला स्वतःची चूक कबूल करून परत जाताना नकोसे झाले होते. 
पण परतणे अटळ होते… (क्रमश:)
वर्षा वेलणकर 

Monday, April 13, 2015

मनीच्या कथा ५

ती परत आली. तिला आदर्श वाटत असलेल्या घरात आणि लोकांत ती परत आली. गेले कित्येक दिवस ती सतत झगडत होती स्वतःचा परिस्थितीशी. आता तिला मोकळं वाटलं. पण अजून घशातला आवंढा गेला नव्हता. आपल्या आयुष्यात असं ही काही कधी तरी घडू शकेल, याचा स्वप्नात ही तिने विचार केला नव्हता. स्वप्नात तर तिचा स्वप्नवत संसार होता. त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली ती तेव्हा फक्त आणि फक्त त्याचा विचार करायची. घरच्यांशी झगडली कारण तोच हवा होता. आणि आता तोच नकोस झालाय?
तो नाही नकोसा झाला. पण ती त्याच्या आजूबाजूची परिस्थिती नकोशी झाली होती. आणि तो असं मला सोडून कसा काय विचार करू शकतो? आणि या बाळाचा विचारही करावासा वाटला नाही त्याला? किती काही होतं आमच्यात? ते हळवे क्षण, ते परस्परांच्या नजरेतील भाव समजून घेणं, त्याचा वाटणारा आधार आणि तरीही त्याचे मुल होऊन मला आधार बनवणं. हे सगळं फक्त तात्पुरतं होतं? नाही. ती आता स्वतःशीच काही गोष्टींचा शहानिशा करू लागली. तात्पुरतं नव्हतं ते. पण काही तरी गोंधळ झालाय खरा.
आता विश्लेषण करण्याची तिची पाळी होती.
"काय काय खटकत गेलं बरं आपल्याला? त्याची कायम नोकरी नसणं ठाऊक होतं लग्नापूर्वी आणि त्यासाठी घरच्यांशी वादही झाला होता. आर्थिक बाजू भक्कम हवी, हा बाबांचा आग्रह प्रेमाच्या नात्यांमध्ये कसा काय आड येऊ शकतो, यावर केवढे काही बोलले होते मी? त्याचा आर्थिक आधार बनण्याची तयारीही दाखवली होती. मग काय झाले? त्याला जावई म्हणून स्वीकारताना आई-बाबा कमी पडले का? त्याचा कधी अपमान -- अगदी नकळत -- झाला असेल का आपली हातून? तो नोकरी करणार नव्हता आणि त्याला त्याच्या आवडीच्या व्यवसायात जम बसवायचा होता, हे त्याने कधीच लपवून ठेवले नव्हते आणि त्या सगळ्याला माझी मान्यता होती. मग आई-बाबा आग्रह धरू लागले नोकरीचा तर आपणही त्याच्या मागे किरकिर केली का? तेव्हा, ही अशी कशी वागू शकते, म्हणून तो दुखावला गेला असेल का?
"आज माझ्या आई-बाबांबद्दल तो म्हणाला की कदाचित त्यांच्यातही दोष असतील आणि आहे ही. तर आपण प्रचंड दुखावले गेलो आणि लगेच सगळं सोडून माहेरी आलो. मी तर गेले दोन वर्ष सतत त्याच्या आई वडिलांचे दोषच दाखवत होते त्याला. मग त्यालाळी राग येणे स्वाभाविक आहे का? पण तो चुकीची बाजू घेत होता. त्याचे आई-वडील चुका करतात, हे त्यालाही मान्य आहे. पण खरंच ते पूर्ण चूक आहेत, हे त्याला त्यांचा मुलगा म्हणून मान्य असेल? कधीतरी त्यालाही जन्म देणाऱ्या त्याच्या पालकांची बाजू त्याला घ्यावी वाटली असेल?
"तो नोकरी करत नाही. पण तो मला काहीही कमी पडू देत नाही. पैसा तो कमावतोच आहे. त्याच्या आवडीच्या व्यवसायात. पण फक्त तो कायम स्वरूपी नोकरी करत नाही म्हणून बाबा त्याला नेहमी घालून-पाडून बोलतात. हे मी ही पाहिले आहे. पण आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा होणारा अपमान आपण कसा काय सहन केला? सहन काय, पूर्ण दुर्लक्ष झाले माझे. बाबा बरोबर आहेत, हेच मनात होते माझ्या आणि माझ्या अश्या वागण्याने तो किती दुखावला गेला असेल?"
पारदर्शी काचेच्या पेल्यातील पाणी आणि पाण्यातील बुडबुडे आता ती पाहू लागली होती. अगदी स्पष्ट काही गोष्टी तिला दिसू लागल्या होत्या.
ती परत येऊ लागली होती. स्वतःकडे! (क्रमश:)

Thursday, April 9, 2015

मनीच्या कथा ४

पुढच्या प्रवासाला निघताना गाठीशी खरेतर कुठलीच गाठ नसावी. त्या सोडवून मोकळं होता येत असेल तर नथिंग लाईक इट. कुठलीही गोष्ट नीट पाहता यावी, जोखता यावी यासाठी पारदर्शी असणे आलेच. आवश्यक असते ते. आणि जितकं स्पॉटलेस, गाठी विरहित अंतरंग, तितका प्रवास निश्चिंत. पापण्या ओलावणारी असो नाहीतर मन बहरवणारी, कुठल्याच आठवणीची गाठ पडायला नको. कारण गाठ म्हणजे धाग्यांच्या आत काहीतरी बांधून ठेवणे. आणि बंधन कुठलेच सुखकारक नसते. बांधून घेणे कुणालाच आवडत नाही. मोकळा श्वास म्हणजेच जगणे. आणि जर मोकळा श्वास आणि जगणेच नसेल तर मग शरीराच्या हालचालींना काय अर्थ?
'ती'ला पाहून असंच काहीसं कायम वाटत राहायचं. माहेर, तिथली माणसं, प्रेम विवाह करून मिळालेले सासर तिथली माणसं आणि तिला आवळून ठेवणारं आणखी एक सत्य - तिचं बाळ.
तसं विरोध पत्करूनच त्याच्याशी लग्न केलं तिनं. पण लग्नापूर्वीचे प्रेम आणि लग्नानंतरच्या बायकोच्या अपेक्षा यातील फरक ओळखायला दोघांनाही वेळच मिळाला नाही. तो नेमका कसा आहे, हे तिला जे ठाऊक होतं.  त्यातील सत्य ताडून पाहण्यासाठीची परिस्थिती तिला उपलब्ध नव्हती. हाच आपला जोडीदार, या निर्णयाप्रत येतानाचे गाठीचे अनुभव पुरेसे नव्हते आणि नाण्याची दुसरी बाजू पाहण्यासाठी काही उपाय नव्हता. तिच्यावरच्या निस्सीम प्रेमापोटी घरच्यांनीही तिचं मन राखलं आणि ती आणि तो विवाहबद्ध झाले. 
पहिले काही इतरांचे जातात तसेच दिवस मजेत गेले. पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. त्याच्या वागण्या-बोलण्यातील तिच्या दृष्टीनं असलेल्या चुका आता त्यांच्या नात्याला बोचू लागल्या. सासरची मंडळी आणि त्या घरातील वातावरण तिच्यासाठी सामान्यतः जसे असायला हवे तसे नव्हते. तिच्या माहेरचे तिचे अनुभव तिच्यासाठी प्रमाण होते आणि त्याच्यासाठी त्या घरची परिस्थिती अनोळखी होती. आता त्याच्या आणि तिच्या अनुभवांचा वाद सुरु झाला होता. योग्य अयोग्य ठरवताना कुणाचेच बरोबर ठरत नव्हते आणि त्यातच तिची घुसमट सुरु झाली. पीळ बसला आणि तो त्यांच्या नात्याभोवती आवळू लागला.
जे घडत होतं ते कुणाजवळ बोलणार? घर आणि घरातील मंडळी यांना मित्र-समान मानत आलेली ती जाऊन जाऊन जाणार कुठे? मग मन मोकळं करायला आई शिवाय पर्याय नव्हता. ती मग सांगायची. जे त्याच्यात आणि तिच्यात घडत होतं ते आणि त्यासाठी ती ज्या लोकांना आणि परिस्थितीला ती जबाबदार धरत होती, ते सारं काही ती सांगू लागली. मग त्याबद्धल ऐकणाऱ्यांची मतं बनत गेली. कुणाची चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे दुसरी बाजू ऐकून न घेताच ठरत गेले. 
ती सांगायची तेच प्रमाण होतं कारण ती त्यांची होती. तो दुसरा होता. तिकडे तो विचार करायचा ते कुणी कधी ऐकून घेतलं नाही. त्याची गरजच वाटली नाही कुणाला. अगदी त्यालाही. आपल्या घरच्यांचे स्वभाव त्यालाही ठाऊक होते आणि त्याबाबत त्याचीही स्वतंत्र मतं होती. पण त्या आपल्या विचारांना खत पाणी घालण्यापेक्षा तो कामात रमला. पण त्याचं गाडं जरा लंगडं होतंच. आर्थिक बाजू भक्कम नसली की व्यक्तिमत्वाचा कणाच कायम मोडका दिसतो. तो ही असाच तिच्यापुढे वाकलेलाच दिसू लागला. तिच्या लोकांनाही आणि त्याच्या घरच्यानाही. पण अजूनही चूक कोण आणि बरोबर कुणाचे हे ठरत नव्हते.
रोजच्या या आवळून घेणाऱ्या परिस्थितीत मार्ग निघत नव्हता. शेवटी त्याने बोलायचे ठरवले.
"अनेकदा स्पष्ट जाणवतं की काही गोष्टी थेट बोलून दाखवता आल्या असत्या तर ज्यांच्यात जीव गुंतलाय त्यांची आयुष्य सावरता आली असती. पण आपण बोलायच्या आणि समोरचा व्यक्ती ते सत्य ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. आपलं माणूस म्हणून त्याचे मन दुखावू नये, हा शिरस्ता. पण आपल्या माणसाने सांगितले म्हणून दुखलं एखाद्यावेळी मन तर समजून घ्यावं ना? ही कसली नाती उराशी कवटाळली आहेत आपण, जिथे सत्याला मोकळा श्वासच घेता येत नाही? चुकला चूक आणि बरोबरला बरोबर, इतकं स्वच्छ बोलणं का नाही? सांभाळून घेताना आणि नाती जपण्यासाठी गोड गोड बोलून सत्य दडवण्याचा खोटेपणा करतोय आपण, हे स्वीकारण्याच धाडस कधी अंगी येणार? स्वतःच्याच माणसांशी खोटं खोटं वागतो आपण आणि तरीही म्हणतो ती आपली आहेत म्हणून हे असं वागणं. कारण त्यांचे मन दुखावू नये? शी! आता स्वतःच राग येतो. पण जाऊन धाडदिशी खरं खरं बोलणं ही जमेल का, याचा विचार करतोय मी. कारण घुसमट थांबवायची आहे मला. रोज गळ्याभोवती पाश आवळून घेण्यापेक्षा एकदा मोकळं व्हायचंय मला आणि त्यांनाही मोकळं करायचं आहे ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो. अर्थात मी जसा वागतोय त्या परिस्थतीत, त्यांच्यावर असलेल्या प्रेमाचा दावा तरी कसा करू? प्रेमात खोटेपणा असतो का?"
तो स्वतःची आणि स्वतःच्या वागण्याची चाचपणी करत होता. तिला होणारा त्रास त्याला कळत होता आणि त्या त्रासाचा त्याला होणारा त्रास त्याला विश्लेषण करायला भाग पाडत होता. ती समंजस आहे, यात त्याला कधीच शंका नव्हती. घर म्हणून तिलाही तिचा संसार प्रिय होता आणि त्यासाठी ती प्रयत्न करताना त्यालाही दिसत होती. मग कसला गुंता होता की सारखे अडखळणे सुरु होते? 
तिला त्या घरातील काही लोकांच्या काही वागण्याचा प्रचंड मानसिक त्रास होत होता. तिला न पटणाऱ्या गोष्टी त्या घरात घडायच्या आणि ते तिला नकोसं वाटायचं. ती त्याला सांगायची. सुरवातीला तो ऐकून घ्यायचा. मात्र नंतर नंतर त्याला हे तिच्या आणि त्याच्या घरातील लोकांच्या सतत तुलनेचा वीट येऊ लागला. त्याच्या घरातल्या लोकांसंदर्भातील आणि वातावरणासंदर्भातील तिची निरीक्षणे त्याने नाकारली नव्हतीच. कारण त्याच्या घरच्यांना तो ही ओळखून होताच. पण त्याचा मुद्दा होता की तुझ्या माहेरचेपण एक विशिष्ट काही गुण-दोष मलाही दिसतात. मग आपण सतत त्यावर परस्परांना बोलणे आणि दोन घरांची सतत तुलना करावी का? 
तिला तिच्या घरातील दोष दिसतंच नव्हते. त्याच्या या बोलण्याने स्फोट झाला. "तो म्हणतो की तुझ्याही आई-वडिलांमध्ये दोष आहेत आणि तुमचे घरही काही आदर्श नाही." तिने तिच्या घरी सांगितले. तुलना खरं तर कुणालाच पसंत नसते आणि दोषारोपण होत असेल तर मग ते मान्य करणे अशक्य असते. "आमची उणी-दुणी काढतो? कसला एवढा माज आलाय त्याला? आहे तरी कोण तो? साधी एक कायम नोकरी मिळवू शकत नाही आणि आमचे गुण-दोष सांगतोय? आता तूच सांग, या अशा मुलाबरोबर तू संसार करणार ज्याला तुझ्या आई-वडिलांचा साधा सन्मान करता येत नाही?"
आणि ती घरी परतली.  (क्रमश:)

मनीच्या कथा ३

मन खातं मनाला जेव्हा मनाचे तरंग मनात उठतात आणि आपण महत्प्रयासाने ते कातडीखालीच किंवा मुखवट्यामागे दडवून टाकतो. नसतेच अशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला की ते हळुवार तरंग कुणाला निरखू द्यावेत. पण या निर्णयाप्रत येण्याच्या कारणांकडे कधी स्वच्छ नजरेने पाहिले आहे का आपण? इतरांबद्दल अविश्वास मनात जन्माला आला, तो क्षण आठवतो आहे का? 
पहिलीच चाचणी ही अशी. जर तो अविश्वास मनात निर्माण करणारा क्षणच आठवणीतून पुसला गेला असेल तर मग अविश्वासही पुसला जावा. आणि दुसरी चाचणी. तो क्षण इतका तीव्र होता की त्याने जखमाच जखमा केल्या असतील तर मग अविश्वासही त्या जखमांचा दुखरा भाग आहे. कदाचित खपली असेल जखमांवर धरलेली आणि आत जखम आहे याची आठवण करून देणारी. मग पाळतो का आपण जखमा शरीरावर? 
मला नाही वाटत. कारण शरीर सुंदर राहावे म्हणून कसली धडपड असते आपली! जखमा निघून जाव्या म्हणून वाट्टेल ते उपचार कातडीवर होतात. होतात ना? अगदी जखमेची खुण सुद्धा राहू नये म्हणून आपण खटाटोप करतो. पण मग मनावरचे ते अविश्वासाचे ओरखडे का जपतो? का त्याला प्रत्येक वेळी उकरत राहतो. "इतकं सोप्पं नाही सगळं. तो अविश्वास असाच नाही निर्माण झाला. आणि म्हणून आता मी नाहीच विश्वास ठेवू शकत कुणावर आणि कशावरही, तुम्ही काहीही म्हणा."
आम्ही कशाला काहीही म्हणू? अनुभव तुझा होता, जखम तुला झाली आणि अविश्वासाला मनात घर तू करू दिलंस. आम्ही कशाला काही म्हणावे? पण जखमेवर इलाज होतो म्हणतोस आणि निशाणही राहू नये शरीरावर जखमांचे म्हणून एवढा प्रयत्न करतो आहेसच तर मग मनाच्याही जखमेची मलमपट्टी कर ना? जखमेतून अविश्वास तुझ्या वाट्याला आला. आता जरा जखमांना औषध लावून विश्वास मिळतो का बघ ना? हो रे! वागलेच ते तसे. कारण त्यांच्यातील काही जखमा त्यांनी मनात पाळून ठेवल्या आहेत. तुझ्याबद्दलची असूया असेल, इतरांनी दिलेले टक्के-टोणपे असतील, समाजाने कधीतरी त्याच्यावरही वार केलाच असेल. म्हणून ते त्याची भळभळणारी जखम उराशी कवटाळून बसले आणि तू विश्वास टाकूनही त्यांनी अविश्वासच दाखवला. मग तू दुखावला गेलास. रक्ताची नाती अशी कशी वागू शकतात, हा प्रश्न त्यांचे वागून झाल्यानंतर पडला ना? म्हणजे त्यांच्याबद्दल आधी विचार केला नाहीस तू? ते माझे आहेत आणि मी काहीही केले तरी त्याचे ते चुकीचे अर्थ लावणार नाही, हा समज (की गैरसमज?) तू का पाळलास मनात? खरंच कधी गृहीत धरलं होतंस का रे त्यांना? कारण तू जर का त्यांच्यावर इतका विश्वास टाकून जगत होतास तर तो विश्वास पोचला कसा नाही रे त्यांच्यापर्यंत? रक्ताची नाती आज जे काही वागताहेत त्याच्याही मागे कारण असेलंच ना? आणि त्या कारणांचा धनी तू ही असू शकतोस ना? 
बरं, बरं… तुझी नाहीच काही चूक! मान्य. अगदी शंभर टक्के मान्य. पण त्यांच्या चुकांचा भार तू का रे वाहतो आहेस? त्यांच्या चुकीच्या धारणांमुळे तुला जखमा झाल्या आणि अविश्वासाचा जन्म झाला. पण त्यांच्या चुकीच्या वर्तनाची शिक्षा आणि सगळ्या खुणा तर तूच वाहतो आहेस? तुझ्या वागण्यात, बोलण्यात, जगण्यात अविश्वास रुजवून ते निघून गेलेत बघ पुढे. त्या बीजाला खतपाणी मात्र तू घालतो आहेस. त्या अविश्वासाने तुझे सारे मनोविश्व व्यापून टाकले आहे. तुला आता जिकडे तिकडे फक्त तो अविश्वास दिसतो. जेव्हा रक्ताची नातीच अविश्वास देतात तर इतरांना तर मोकळे रानंच! ते तर काहीही करू शकतात. कारण ते तुझे नाहीत. पण मग अश्या तुझ्या नसलेल्या कुणीतरी तुझ्यावर विश्वास टाकला भाबडा तर तू त्यालाही शिक्षा देणार अविश्वास दाखवून? इतका दुष्ट तू आहेस जन्मतःच? की तुझ्यात दुष्टपणाही त्या जखमा देणाऱ्या नात्यांचीच देण? मग तू तुझ्या गोष्टी वापरणार जगताना की इतरांनी तुझ्यावर मारलेल्या दगडांचे घर बांधून त्यात राहणार? जखमा पोसायाच्या का? की कात टाकून नव्याने जगायचे? 
घे आता एक मोकळा ढाकळा मस्त श्वास. एका बेसावध क्षणी, तुझी काहीही चूक नसताना आणि तू स्वप्नातही अपेक्षा केली नव्हतीस तो अविश्वास तुझ्या आयुष्यात असा अचानक आला आणि उध्वस्त करून गेला तुला. अत्यंत वाईट झाले. पण आता आणखी एका शक्यतेचा विचार कर. असाच एखाद्या बेसावध क्षणी, तुला अजिबात म्हणजे अजिबात अपेक्षा नसताना आणि रक्ताच्या नात्यांनी दिलेल्या त्या भयंकर जखमांनंतर स्वप्नातही ज्याची अपेक्षा तू आता करत नाहीस तो विश्वास एक दिवस तुझ्या मनाच्या उघड्या कवाडातून आत आला तर?  
त्याचे स्वागत कर. जखमांना बरं होण्यासाठी काही काल लागतो. तो तू घेच. पण व्रण राहू नये शरीरावर तसेच ते मनावरही राहू नये म्हणून काही करता येतं का बघ. इथे प्रश्न आहे धारणेचा. अविश्वास धारण करायचा की विश्वास? अर्थात, हळव्या मनांना रक्ताच्या नात्यातून मिळणाऱ्या जखमांचे जास्त दु:ख होते आणि अशी हळवी मनं कधीच अविश्वासासारख्या नकारात्मक गोष्टीला मनात जपत नाहीत. म्हणजे उत्तर सोप्पं आहे, नाही का? 
वर्षा वेलणकर 

Saturday, March 28, 2015

मनीच्या कथा-२

हे जे मन नावाचे प्रकरण आहे न, ते भारीच आहे बुवा! सोबतीला असतं कायम. पण प्रत्येक वेळी त्याचं सारंच काही ऐकायचं आणि, पटलं रे तुझं म्हणणं, असं म्हणायचं, हे काही शक्य नसतं. पण याला ना डावलून चालतही नाही. जरा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कि फुरंगटून बसतं. मग गरज असेल त्याची तरी मदतीला ते धावून येईल तर शपथ! मन आणि शरीर यांची सांगड घालता घालता नाकी नऊ येतात. त्यात जगाची रीत आहे ती पण भारी छळतेच आपल्याला. अशात मनाने सांगितलेलं एकवेळ पटेल पण अशी मनमानी कृती करायला शरीराची साथ हवी? आणि कृती ही अशी कि जिला समाजाची मान्यता असेल? 
पण आता नाहीच धरवत धीर. ती माझी आहे. माझी मैत्रीण आणि तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरील बोलक्या डोळ्याभोवतीचं काळं, नाहीच पाहवत आता. तिच्या मनीची व्यथा आता शब्दांच्या आधाराविना पोचते आहे माझ्यापर्यंत. पण तिचं ते प्रसन्न हसणं? दोन गोष्टी दृश्य आहेत न? मग त्यातील कुठली खरी मानायची? दोन्हीत सत्य -- निदान नजरेला दिसणारे -- आहेच. मग एक खरे आणि एक खोटे कसे ठरवायचे बरे?
म्हणून मग मनाला जरा मदतीला घ्यायचे म्हटले. तर हे आपलं रुसून बसलेलं! म्हणालं, इतका संवाद घडतो आपल्यात पण तू ऐकत नाहीस हा माझं. चुका होतात तुझ्याकडून आणि मग त्रास करून घेतेस जीवाला. या विधानाला कसं बरं नाकारायचं? मनाविरुद्ध जाउन केलेल्याचा शारीरिक आणि मानसिक थकवा किती येतो हे आता नव्याने सांगायला हवे का? मान्य रे मना! नाही ऐकलं तुझं कि त्रास होतोच. पण आता माझ्या भूतकाळातील चुकांचा पाढा वाचू नकोस ना. आत्ताच्या या द्विधा मनस्थितीबद्दल बोल. दिसतंय त्यातील काय खरे आणि काय खोटे?
हसू काय, ठरवून चेहऱ्यावर आणता येतं. पण ते जे डोळ्याभोवतीचे काळे आहे न, तो परिणाम आहे आत चाललेल्या उलाढालीचा, मन सांगू लागतं. उलाढाल? हो. मनाविरुद्धची रस्सीखेच चालली आहे आत आणि आता ती डोळ्यावाटे दिसू लागली आहे. बापरे, माझ्या मनाला तिच्याबद्दल बरंच काही कळतंय. पण तिला विचारलं परवा तर हसण्यावारी नेलं तिनं. म्हणाली, तुला उगाच काहीतरी विचार करायची सवयच आहे. पण मग माझं निरीक्षण बरोबर होतं रे!! मग आता पुन्हा काय बोलू तिच्याशी? सांग तिला तिच्या मनाशी बोलायला आणि त्याचं काही काही ऐकायला. थोडा त्रास होईल. पण मग हळूहळू परिणाम दिसू लागतील आणि जाईल ते काळं, माझं मन मला सांगत होतं. 
इथेच तर गाडं अडतं कायम. जे मनाला पटलेलं असतं आणि स्वतःला योग्य वाटत असतं ते स्पष्ट शब्दात बोलून दाखवायला जीभ धजत नाही. का? आता हेच बघा ना. गेले तिला सांगायला कि बाई गं, तुझी काळजी वाटते आणि काहीतरी रुतून बसलंय गं तुझ्या आत  मदत करू का तुला वाहतं व्हायला? तर तिला काय वाटेल? तिच्या व्यक्तिगत, खाजगी आयुष्यात दखल दिल्यासारखे होईल का रे मना ते? तिला राग आला, माझं बोलणं नाही आवडलं तर मैत्री संपेल न आमची?
काळजी वाटते आहे ना तिची? माझं मन आता वाद घालण्याच्या मूडमध्ये येतं. ती मैत्रीण आहे ना तुझी? काही आनंदाचे क्षण आणि काही विशेष दोघींच्याही संबंधात आहे ना? मग त्याच काळजीचा हवाला देऊन एक गोष्ट स्वतःलाच विचार बरं? तुझ्या मनात तिच्याबद्दल जे काही चालले आहे ते तिच्यापासून लपवून ठेवणे म्हणजे मैत्री का गं? कुठल्याही नात्याची इमारत सत्याच्या आधारावर उभी असते. असत्य बोलून आणि वागून मैत्री काय काहीच टिकत नाही. तिच्यावर खरंच प्रेम असेल तर तुझ्या मनाने तुला जे सांगीतलं ते तिला स्वच्छ सांग. ते ऐकून तिला नाही आवडलं आणि तिने संबंध संपवले तरी एक समाधान कायम मनात राहील तुझ्या की तू तिच्याशी खोटं वागली नाहीस.
मन भारीच स्ट्रेट फॉरवर्ड आहे, नाही का!
वर्षा वेलणकर 

Friday, March 27, 2015

मनीच्या कथा-१

पेक्षांचे बाई भारी गुंते असतात. स्वेटर विणायला पूर्वी लोकरीचे वेढे मिळायचे आणि ते वेढे दोन मांड्यांमध्ये अडकवून त्याचा गोळा तयार करताना जसा वेढ्यातील गुंता सुटत जातो, तसे हे अपेक्षांचे गुंते सुटावे, असं मनापासून वाटतं. तसं हे विधानही जरा गुंतागुंतीच आहे म्हणा. थोडा हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करूयात.
आपण काहीतरी करतो स्वतःसाठी आणि मग ते सातत्याने करत राहण्याचा नियम मात्र करायला विसरतो. अनेकदा कारण असतं कि कुणाला काय फरक पडणार आहे आपण नाही हा नियम पाळला तर? पण तसं नाही. सभोवतालच्या गर्दीत कुणीतरी विनाकारण आपण नित्य नेमाने काही गोष्टी कराव्यात याची वाट पहात असतं.
म्हणजे आपण घराचा रिवाज म्हणून, किंवा घरातील थोरा-मोठ्यांनी केलेला नियम म्हणून काही गोष्टी करतो. नव्यानं लग्न होऊन घरात आलेली सून मग अशीच रोज अंगणात सडा घालते आणि आपल्या कलागुणांचे प्रदर्शन व्यवस्थित व्हावे म्हणून एक छानशी रांगोळीही घालते दारात. घरातल्यांसाठी त्यात कौतुकाचे काही शिल्लक राहत नाही. सांगितले ते केले आणि करते आहे हं नियमाने, एवढा एक प्रतिसाद मिळतो आणि मग तो शब्दात रोज व्यक्त करण्याची गरज संपते.
मन मात्र ते कौतुक, ते शब्द रोजच ऐकायला उत्सुक असतं. पण तसं होत नाही. घरातील नवीन व्यक्तीने घराचे नियम पाळावे ही एक अपेक्षा आणि ते नियम नित्य नेमाने पाळले जातात नव्या व्यक्तीकडून म्हणून त्याची दखल घेतली जावी, ही एक अपेक्षा.  काय बरं असं मोठं बिकट यात आहे कि ज्यामुळे या दोन अपेक्षांच्या एकत्र येण्याने नात्यांमध्ये गुंता निर्माण होतो? नव्या व्यक्ती नियम पाळावे ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तरी गुंता होतो आणि ती पूर्ण झाली तरी गुंता होतो.
कारण एक अढी यात आहे. आणि ती म्हणजे पूर्ण आणि अपूर्ण राहणारी अपेक्षा ज्या एका कामाशी जोडलेली आहे ते आपण स्वतःच्या आनंदासाठी न करता फक्त नियमासाठी करतो. दारात सडा आणि छानशी रांगोळी हा घराचा नियम आहे, असे न मानता घराच्या प्रसन्न अस्तित्वासाठी त्याची गरज आहे, हे जर नव्याने घरात आलेल्या व्यक्तीला सांगितल्या गेले तर? आणि ती प्रसन्नता टिकविणे आता तुझ्या हाती, असं सांगितलं तर?
आणि घरात नव्याने आलेल्या व्यक्तीने ही, आपली हि कृती केवळ एक कर्तव्यभाव म्हणून पाहण्यापेक्षा आपल्या जगण्याचा एक घटक म्हणून स्वीकार केली तर? रोज श्वास घेऊन, खायला देऊन जिवंत ठेवले आहेस बाबा मला, म्हणून शरीर रोज धन्यवाद देतं बसतं? किंवा आपण तशी अपेक्षा ठेवावी? ज्या घरात आता आपण राहणार तिथली हि एक गोष्ट आता माझ्या जगण्याचा घटक आहे, असे मान्य केले तर त्या गोष्टीच्या पूर्ततेसाठी रोज आपल्याला कौतुकाची थाप मिळावी हि अपेक्षाही काही काळाने निमालेली दिसेल.
आता इथेच तर खरी गंमत आहे. ती असते दाराबाहेरची. घरातील लोक जे करतात त्याला नित्यनेमाने पाहणारे दारासमोरून जातात. हे अनोळखी लोक रोज दारातला सडा आणि ती मन प्रसन्न करणारी रांगोळी पाहतात. कौतुक त्यांच्या डोळ्यात असतं. पण आपल्यापर्यंत ते पोचत नाही. कारण आपण घरातल्या अपेक्षांच्या गुंत्यांत अडकलेलो. पण हे दारासमोरून रोज रांगोळी न्याहाळत जाणारेही एक अपेक्षा घेऊन जगू लागतात. या दारात कायम रांगोळी दिसणारच, ही गोष्ट त्यांनी त्यांच्या मनाला सांगितली असते. एक दिवस का सडा-रांगोळी दिसली नाही तर खट्टू मनाने ते दारापुढून जातात.  असा कसा या घराने रोजचा नेम मोडला? त्यांचा अपेक्षाभंग होतो.
आता काही वेळेला अशी व्यक्ती कोण हे ठाऊक नसतं आपल्याला. किंवा ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोचतही नसेल. पण गृहीत धरायला हवंच का त्यांना? आवश्यक आहे ते? गृहीत धरायला हवंच का कि तुमची कुणीतरी वाट पहातंय? तुम्ही अंगणात सडा टाकून रांगोळी घालणारच, अशी अपेक्षा कुणाची तरी आहे. आणि तुमच्या दारासमोरून तुम्हाला स्वतःचा कुठलाही परिचय न देत तुमच्या सड्याची आणि रांगोळीची अपेक्षा करणारी व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाची ठरायला हवी? अशा अनोळखी व्यक्तीच्या अपेक्षांसाठी स्वतःला म्हणून नियम घालून घ्यावेत?
म्हणून म्हटलं, अपेक्षांचे बाई भारी गुंते असतात.

वर्षा वेलणकर