Saturday, March 28, 2015

मनीच्या कथा-२

हे जे मन नावाचे प्रकरण आहे न, ते भारीच आहे बुवा! सोबतीला असतं कायम. पण प्रत्येक वेळी त्याचं सारंच काही ऐकायचं आणि, पटलं रे तुझं म्हणणं, असं म्हणायचं, हे काही शक्य नसतं. पण याला ना डावलून चालतही नाही. जरा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कि फुरंगटून बसतं. मग गरज असेल त्याची तरी मदतीला ते धावून येईल तर शपथ! मन आणि शरीर यांची सांगड घालता घालता नाकी नऊ येतात. त्यात जगाची रीत आहे ती पण भारी छळतेच आपल्याला. अशात मनाने सांगितलेलं एकवेळ पटेल पण अशी मनमानी कृती करायला शरीराची साथ हवी? आणि कृती ही अशी कि जिला समाजाची मान्यता असेल? 
पण आता नाहीच धरवत धीर. ती माझी आहे. माझी मैत्रीण आणि तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरील बोलक्या डोळ्याभोवतीचं काळं, नाहीच पाहवत आता. तिच्या मनीची व्यथा आता शब्दांच्या आधाराविना पोचते आहे माझ्यापर्यंत. पण तिचं ते प्रसन्न हसणं? दोन गोष्टी दृश्य आहेत न? मग त्यातील कुठली खरी मानायची? दोन्हीत सत्य -- निदान नजरेला दिसणारे -- आहेच. मग एक खरे आणि एक खोटे कसे ठरवायचे बरे?
म्हणून मग मनाला जरा मदतीला घ्यायचे म्हटले. तर हे आपलं रुसून बसलेलं! म्हणालं, इतका संवाद घडतो आपल्यात पण तू ऐकत नाहीस हा माझं. चुका होतात तुझ्याकडून आणि मग त्रास करून घेतेस जीवाला. या विधानाला कसं बरं नाकारायचं? मनाविरुद्ध जाउन केलेल्याचा शारीरिक आणि मानसिक थकवा किती येतो हे आता नव्याने सांगायला हवे का? मान्य रे मना! नाही ऐकलं तुझं कि त्रास होतोच. पण आता माझ्या भूतकाळातील चुकांचा पाढा वाचू नकोस ना. आत्ताच्या या द्विधा मनस्थितीबद्दल बोल. दिसतंय त्यातील काय खरे आणि काय खोटे?
हसू काय, ठरवून चेहऱ्यावर आणता येतं. पण ते जे डोळ्याभोवतीचे काळे आहे न, तो परिणाम आहे आत चाललेल्या उलाढालीचा, मन सांगू लागतं. उलाढाल? हो. मनाविरुद्धची रस्सीखेच चालली आहे आत आणि आता ती डोळ्यावाटे दिसू लागली आहे. बापरे, माझ्या मनाला तिच्याबद्दल बरंच काही कळतंय. पण तिला विचारलं परवा तर हसण्यावारी नेलं तिनं. म्हणाली, तुला उगाच काहीतरी विचार करायची सवयच आहे. पण मग माझं निरीक्षण बरोबर होतं रे!! मग आता पुन्हा काय बोलू तिच्याशी? सांग तिला तिच्या मनाशी बोलायला आणि त्याचं काही काही ऐकायला. थोडा त्रास होईल. पण मग हळूहळू परिणाम दिसू लागतील आणि जाईल ते काळं, माझं मन मला सांगत होतं. 
इथेच तर गाडं अडतं कायम. जे मनाला पटलेलं असतं आणि स्वतःला योग्य वाटत असतं ते स्पष्ट शब्दात बोलून दाखवायला जीभ धजत नाही. का? आता हेच बघा ना. गेले तिला सांगायला कि बाई गं, तुझी काळजी वाटते आणि काहीतरी रुतून बसलंय गं तुझ्या आत  मदत करू का तुला वाहतं व्हायला? तर तिला काय वाटेल? तिच्या व्यक्तिगत, खाजगी आयुष्यात दखल दिल्यासारखे होईल का रे मना ते? तिला राग आला, माझं बोलणं नाही आवडलं तर मैत्री संपेल न आमची?
काळजी वाटते आहे ना तिची? माझं मन आता वाद घालण्याच्या मूडमध्ये येतं. ती मैत्रीण आहे ना तुझी? काही आनंदाचे क्षण आणि काही विशेष दोघींच्याही संबंधात आहे ना? मग त्याच काळजीचा हवाला देऊन एक गोष्ट स्वतःलाच विचार बरं? तुझ्या मनात तिच्याबद्दल जे काही चालले आहे ते तिच्यापासून लपवून ठेवणे म्हणजे मैत्री का गं? कुठल्याही नात्याची इमारत सत्याच्या आधारावर उभी असते. असत्य बोलून आणि वागून मैत्री काय काहीच टिकत नाही. तिच्यावर खरंच प्रेम असेल तर तुझ्या मनाने तुला जे सांगीतलं ते तिला स्वच्छ सांग. ते ऐकून तिला नाही आवडलं आणि तिने संबंध संपवले तरी एक समाधान कायम मनात राहील तुझ्या की तू तिच्याशी खोटं वागली नाहीस.
मन भारीच स्ट्रेट फॉरवर्ड आहे, नाही का!
वर्षा वेलणकर 

No comments:

Post a Comment