Saturday, April 25, 2015

वाचन

दिवसच्या दिवस जातो कधी कधी वाचण्यात तिचा… त्यात फक्त अक्षरंच नसतात… कधी हातातला कणकेचा उंडा असतो, पोळपाटावरची गोल होत गेलेली पोळी असते तर कधी तव्यावर विस्तवाच्या सहवासाने मिळालेले चटके अंगावर घेऊन टम्म फुललेली चपाती असते… तिलाही आला असेल का विस्तवाचा राग? तिच्या अस्तित्वाला पूर्णत्व नाही त्याच्याशिवाय हे सत्य आहे की एक बनाव? सत्य असेल तरी आता हे रोजचे जीवघेणे भाजून घेणे नको असेल तिला तर? तोच जाळ, तेच चटके, ते स्वतःचे धुमसत जाणे, अगदी दोन्ही अंगांनी चिकटणाऱ्या यातना… नकोश्या झाल्या असतील तिला तर? हे सगळे पुर्णत्वाकडे नेणारे असले तरीही नकोच असेल तिला तर? पूर्णत्वच नको असेल तर? 
दिवसच्या दिवस जातो असा वाचण्यात… तेलात तडतडणारी मोहरी आणि गळ्यातल्या काळ्या मण्याची दोरी… मोहरीचा दाणा फुटून हातावर येतो तेव्हा गळ्यातला त्या काळ्या मण्यांच्या फासाला सणकन एक हिसडा द्यावा आणि फेकून द्यावे… स्वतःला वाचताना ती हे कित्येकदा मोठ्याने उद्गारली देखील… "एवढं इनटेन्स कुठल्या पुस्तकात आहे?" म्हणून विचारणा होते… 
मग ती वाचत सुटते दिवसच्या दिवस… हे वाक्य उच्चारणाऱ्या पेपराआड दडलेल्या चेहऱ्याला… पेपर असतो मधे, चष्म्याच्या दोन काचा असतात आणि बुबुळांवर अर्ध्यापर्यंत उतरलेल्या पापण्या असतात… पण वाचत जाते ती… वाचावेच लागते… वाचले नाही तर ती वाचणार कशी? शरीर जगवायला हवा, पाणी, अन्न लागतं आणि शरीर का जगवतो आहे या प्रश्नाचे उत्तरही लागते… ते कुठे शोधायचे? 
मग ती तत्वज्ञान वाचते… दिवसच्या दिवस… एका व्यक्तीच्या जन्माला येण्याचे कारण काय, हे ज्ञान ज्याने मिळवले आहे त्याचे शब्द ती वाचते. कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नसते, या वाक्यावर अडखळायला होतं तिला… मग पूर्ण कसे व्हावे, हे वाचते. आणखी एक अपूर्ण व्यक्ती तुम्हाला पूर्ण करते, हे वाचूनच तर तिने निर्णय घेतला होता… पण ते अपूर्णत्व आता फक्त तिच्या एकटीच्या मालकीचे आहे, हे सिद्ध करणारी कित्येक विधाने ती गेल्या अनेक वर्षांच्या, अनेक दिवसांच्या, अनेक क्षणांमध्ये हर घडी वाचत आली आहे. तिच्या भोवताली म्हणे अपूर्ण असे काही आणि कुणीच नाही. हे त्या सभोवतालच्या चेहऱ्यांवर ती वाचते. 
वाचतेच तर आहे ती दिवसच्या दिवस… तिचे अंतरंग… तिथे ठसठशीत प्रश्नार्थक चिन्हांची गर्दी आहे, हे तिला वाचूनच तर कळले… पूर्वी प्रश्नार्थक चिन्हे पाहून, उद्गारवाचक चिन्हाला असे अर्ध वर्तुळ कुणी दिले शिरावर? चुकले असेल लिहिताना, असंही तिला वाटायचे… पण हळूहळू तिला त्यातील फरक कळला… मग ती वाचत राहिली… आता कधी कधी तिला भानच राहत नाही आणि मग काळीज स्वतःचे उलटे कधी झाले हे न कळून ती वाचत राहते दिवसच्या दिवस… ठसठशीत प्रश्नार्थक चिन्हे उलटी दिसतात तिला… एखाद्या हुक सारखी ती लटकलेली असतात उलट्या काळजाला… 

वर्षा वेलणकर 

No comments:

Post a Comment