Monday, April 13, 2015

मनीच्या कथा ५

ती परत आली. तिला आदर्श वाटत असलेल्या घरात आणि लोकांत ती परत आली. गेले कित्येक दिवस ती सतत झगडत होती स्वतःचा परिस्थितीशी. आता तिला मोकळं वाटलं. पण अजून घशातला आवंढा गेला नव्हता. आपल्या आयुष्यात असं ही काही कधी तरी घडू शकेल, याचा स्वप्नात ही तिने विचार केला नव्हता. स्वप्नात तर तिचा स्वप्नवत संसार होता. त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली ती तेव्हा फक्त आणि फक्त त्याचा विचार करायची. घरच्यांशी झगडली कारण तोच हवा होता. आणि आता तोच नकोस झालाय?
तो नाही नकोसा झाला. पण ती त्याच्या आजूबाजूची परिस्थिती नकोशी झाली होती. आणि तो असं मला सोडून कसा काय विचार करू शकतो? आणि या बाळाचा विचारही करावासा वाटला नाही त्याला? किती काही होतं आमच्यात? ते हळवे क्षण, ते परस्परांच्या नजरेतील भाव समजून घेणं, त्याचा वाटणारा आधार आणि तरीही त्याचे मुल होऊन मला आधार बनवणं. हे सगळं फक्त तात्पुरतं होतं? नाही. ती आता स्वतःशीच काही गोष्टींचा शहानिशा करू लागली. तात्पुरतं नव्हतं ते. पण काही तरी गोंधळ झालाय खरा.
आता विश्लेषण करण्याची तिची पाळी होती.
"काय काय खटकत गेलं बरं आपल्याला? त्याची कायम नोकरी नसणं ठाऊक होतं लग्नापूर्वी आणि त्यासाठी घरच्यांशी वादही झाला होता. आर्थिक बाजू भक्कम हवी, हा बाबांचा आग्रह प्रेमाच्या नात्यांमध्ये कसा काय आड येऊ शकतो, यावर केवढे काही बोलले होते मी? त्याचा आर्थिक आधार बनण्याची तयारीही दाखवली होती. मग काय झाले? त्याला जावई म्हणून स्वीकारताना आई-बाबा कमी पडले का? त्याचा कधी अपमान -- अगदी नकळत -- झाला असेल का आपली हातून? तो नोकरी करणार नव्हता आणि त्याला त्याच्या आवडीच्या व्यवसायात जम बसवायचा होता, हे त्याने कधीच लपवून ठेवले नव्हते आणि त्या सगळ्याला माझी मान्यता होती. मग आई-बाबा आग्रह धरू लागले नोकरीचा तर आपणही त्याच्या मागे किरकिर केली का? तेव्हा, ही अशी कशी वागू शकते, म्हणून तो दुखावला गेला असेल का?
"आज माझ्या आई-बाबांबद्दल तो म्हणाला की कदाचित त्यांच्यातही दोष असतील आणि आहे ही. तर आपण प्रचंड दुखावले गेलो आणि लगेच सगळं सोडून माहेरी आलो. मी तर गेले दोन वर्ष सतत त्याच्या आई वडिलांचे दोषच दाखवत होते त्याला. मग त्यालाळी राग येणे स्वाभाविक आहे का? पण तो चुकीची बाजू घेत होता. त्याचे आई-वडील चुका करतात, हे त्यालाही मान्य आहे. पण खरंच ते पूर्ण चूक आहेत, हे त्याला त्यांचा मुलगा म्हणून मान्य असेल? कधीतरी त्यालाही जन्म देणाऱ्या त्याच्या पालकांची बाजू त्याला घ्यावी वाटली असेल?
"तो नोकरी करत नाही. पण तो मला काहीही कमी पडू देत नाही. पैसा तो कमावतोच आहे. त्याच्या आवडीच्या व्यवसायात. पण फक्त तो कायम स्वरूपी नोकरी करत नाही म्हणून बाबा त्याला नेहमी घालून-पाडून बोलतात. हे मी ही पाहिले आहे. पण आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा होणारा अपमान आपण कसा काय सहन केला? सहन काय, पूर्ण दुर्लक्ष झाले माझे. बाबा बरोबर आहेत, हेच मनात होते माझ्या आणि माझ्या अश्या वागण्याने तो किती दुखावला गेला असेल?"
पारदर्शी काचेच्या पेल्यातील पाणी आणि पाण्यातील बुडबुडे आता ती पाहू लागली होती. अगदी स्पष्ट काही गोष्टी तिला दिसू लागल्या होत्या.
ती परत येऊ लागली होती. स्वतःकडे! (क्रमश:)

4 comments: