"किती काही उरतं तासनतास बोलून झाल्यावरही! एक तरी शब्द वापरायचा राहूनच जातो घडाभर वर्णन केल्यावर. दिवसाच्या घडामोडींचा आढावा घेऊन होतो. त्यावर उमटलेले राग-लोभाचे गिळलेले आवंढे ओकून होतात. प्रेम बोलून होतं, जिव्हाळा व्यक्त करून होतो. त्यात बेमालूम विणलेल्या असूयेचा, अप्रामाणिकतेचा एक धागा ही लपवून ठेवल्या जातो. पण तरीही राहतच काहीतरी अव्यक्त. भर दुपारी भरून आलेल्या आभाळाच्या पाठच्या सूर्याची किरणं जशी कातडीवर पडत नाही तसं काहीतरी आत असूनही ओठावर येत नाही. शब्द साथ देईनासे होतात. वाळून कडकडीत झालेली सुबाभळीची शेंग तटकन टिचकते तसं काहीसं आत टीचकत राहतं. कान देऊन ऐकलं तर आवाजही होतो त्याचा. पण तटतटून फुटतानाचा क्षण शब्दात मांडताच येत नाही. हि अशी कशी अवस्था असते … कण कण भोगूनही सांगताच न येणारी? पराकोटीची अगतिकता ती हिच का?"
किचनमधल्या ओटाभर पसरलेल्या भांड्यात तिचं हे असं अस्ताव्यस्त हरवल्यासारखं बोलत सुटणं तसं नवीनच. तिची घुसमट हातातल्या घासणीनं भांड्यांवर आणि ऐकणाऱ्याच्या मनावर ओरखडे उमटवणारी. प्रश्न इतरांना उद्देशून असले तरी उत्तरं तिची तिलाच ठाऊक असतात. मग ती पुढे बोलत सुटते. एकीकडे भांडी लख्ख होतात आणि पसारा आवरल्या जातो. तीही बोलून बोलून आवरत सावरत जाते. कामात गुंतलेले हात आणि तोंडभर शब्द. ती हि अशीच भेटत सुटते सगळ्यांना. किंबहुना इतरच भेटतात तिला. वारंवार. आणि आलेल्यांकडे ढुंकूनही न पाहता ती फक्त बोलत असते. तिच्या कामाबद्दल आणि त्या कामासंदर्भात इतरांकडून असलेल्या अपेक्षांबद्दल किंवा मदती बद्दल. क्वचित कधी कुणी तिच्याबद्दल विचारलाच तर ती सांगतेच. हातच काहीही राखून न ठेवता.
"शाळेत असतानाच माय-बाप गेले आणि त्यानंतर आश्रम शाळेच्या छपराखाली आणखी खुरटी होत गेले."
"वाढत गेले म्हणायचं असेल का हिला?" इतका बावळट प्रश्न विचारणारे कुणी भेटलेच तर ती तिची कथा पुढे ऐकवते.
"कधी पाहिलीत का आश्रम शाळा? कुणाला वाढताना पाहिलं आहे शाळेच्या चार भिंतीत? शाळेत मिळालीच तर फक्त माहिती मिळत राहते. Only information. You earn knowledge when you are out of those walls. बाहेरचं हे जे जग आहे न त्यात खऱ्या परीक्षा द्याव्या लागतात. तुम्हाला बरं असतं २१ अपेक्षित आयते मिळतात. आम्हाला तर syllabus पण देत नाही कुणी."
बोलताना तिच्या अश्या घसरण्याचीही आता इतरांना सवय झाली आहे. पण ते बोलणे आपल्याला उद्देशून नाही, हे न समजण्या इतके बावळट लोक तिच्या वाट्याला आलेले नाहीत. पण क्षणात कणखर, स्पष्ट असणारी ती इतकी अगतिक का होते, याचा अंदाज घेणं कठीण होतं. ती पसारा हातावेगळा करते आणि तिला ऐकणारे तिच्या अशा असंबद्ध बोलण्याच्या संदर्भ शोधाच्या गुंत्यात गुंतत जातात.
"हि अगदी पुस्तकातल्या सारखं बोलते आहे, नाही का? एखाद्या आर्ट फिल्म मधला संवाद शोभेल इतकं परफेक्ट. आपणच हे सारे लिहून घ्यावे आणि तिची गोष्टही लिहावी. दिवाळी अंकाला पाठवली तर नक्की छापल्या जाईल." असं काहीसं खूप creative आणि उद्दात्त वगैरे ऐकणाऱ्याच्या मनात फुलत जातं. तिची कहाणी इतरांना सांगावी, यावर तुम्ही ठामपणे निर्णय घेता. या विचारांनी थांबलेले श्वसन एक मोठ्ठा श्वास घेत पुढे सुरु होते. तिचे बडबडणे आणि कामात गडबडणे सुरु असतानाच तिच्या तुम्ही लिहू घातलेल्या कथेतील वाक्य डोळ्यापुढे नाचू लागतात आणि तुम्ही नकळत तिच्या पलीकडे पाहू लागता. शून्यात पाहिल्या सारखे. तिच्या जीवनाचा तो जो काय आलेख वगैरे असतो त्याची मांडणी तुम्ही करू लागता.
एका संस्थेत निराधार स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळवून देण्याचं काम ती गेली अनेक वर्ष करते आहे. स्वतःवरील निराधाराचा शिक्का पुसून तिला बरीच वर्ष झाली आहेत तशी. म्हणून ती असे शिक्के घेऊन जगणाऱ्यांच्या मदतीला धावून जाते. रस्त्यावर, कचराकुंडीत, नाल्यात, रेल्वे स्टेशनवर आणि वाट्टेल तिथे तिलाच कसे काय असे निराधार भेटतात कुणास ठाऊक. "कदाचित स्वजातीय म्हणून ते माझ्या मागावर असले पाहिजेत. वास लागत असेल माझा."
पण तिचा खरा त्रास काही वेगळाच आहे. तिच्या तोंडाचा पट्टा सुटण्याचे कारणही वेगळेच आहे.
"नकोसे झालात तुम्ही आम्हाला. म्हणून चिडचिड होते आहे माझी," ती एकदम उद्गारते.
"काय केलं आम्ही?" पुन्हा एक बावळट प्रश्न असतोच तिच्यासाठी.
"आमच्यासारख्या ज्या इतरांच्या आधाराची गरज असलेल्या व्यक्ती आहेत न त्यांना आता नकोसे वाटू लागले आहेत तुमचे आधार. सतत पांगळेपणा कुणाला हवा असतो? पण तुम्ही मदत करणारे सतत इतके जवळ असता कि आपल्या दुबळेपणाची आणि असहाय असल्याची सतत जाणीव होत राहते. हे तुम्ही असे निराधार लोकांना मदत करणारे आणि त्याच्या संस्था चालवणारे. पोटं भरताहात सगळी स्वतःची. कुणी आपल्या तथाकथित सामाजिक जबाबदारीची कारणं पुढे करत स्वतःसाठी एक प्रतिष्ठा मिळवता आहात तुम्ही. तुम्ही आमच्यासारख्यांना जेव्हा मदत करायला सरसावता ना तेव्हा आसूडाचे फटकारे बसतात मनावर. आपले संपूर्ण जगणेच असे कुणाच्या तरी आधाराने असण्यापेक्षा मृत्यू जवळ करावासा वाटतो. पण तुम्ही नाही मरू देणार आम्हाला. कारण आमचे जाणेही तुमच्या प्रतिष्ठेला धुळीस मिळवणारे आहे. आम्ही बांडगुळा सारखे जगलो नाही तर तुमच्यावर सतत आरोप होतील. म्हणून तगवून ठेवले आहे तुम्ही आम्हाला.
"आम्ही अनुभव पुरवतो तुम्हाला. आयुष्यात काय करू नये आणि काय वाट्याला येऊ नये याची जिवंत उदाहरणे आहोत आम्ही. आमच्या दुःखाची लक्तरं वेशीवर टांगून तुम्ही सत्काराच्या शाली मिळवता. मला नाही पसंत हे. खबरदार माझी कथा करून विकलीस कुठल्या मासिकाला तर! मी अगतिक नाही. निराधार नाही आणि माझे आयुष्य विकाऊ नाही."
आता तिची कथा पूर्ण होते. ती नायिका असलेली तिची कथा! तिच्याच शब्दात!
वर्षा वेलणकर
No comments:
Post a Comment