मन खातं मनाला जेव्हा मनाचे तरंग मनात उठतात आणि आपण महत्प्रयासाने ते कातडीखालीच किंवा मुखवट्यामागे दडवून टाकतो. नसतेच अशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला की ते हळुवार तरंग कुणाला निरखू द्यावेत. पण या निर्णयाप्रत येण्याच्या कारणांकडे कधी स्वच्छ नजरेने पाहिले आहे का आपण? इतरांबद्दल अविश्वास मनात जन्माला आला, तो क्षण आठवतो आहे का?
पहिलीच चाचणी ही अशी. जर तो अविश्वास मनात निर्माण करणारा क्षणच आठवणीतून पुसला गेला असेल तर मग अविश्वासही पुसला जावा. आणि दुसरी चाचणी. तो क्षण इतका तीव्र होता की त्याने जखमाच जखमा केल्या असतील तर मग अविश्वासही त्या जखमांचा दुखरा भाग आहे. कदाचित खपली असेल जखमांवर धरलेली आणि आत जखम आहे याची आठवण करून देणारी. मग पाळतो का आपण जखमा शरीरावर?
मला नाही वाटत. कारण शरीर सुंदर राहावे म्हणून कसली धडपड असते आपली! जखमा निघून जाव्या म्हणून वाट्टेल ते उपचार कातडीवर होतात. होतात ना? अगदी जखमेची खुण सुद्धा राहू नये म्हणून आपण खटाटोप करतो. पण मग मनावरचे ते अविश्वासाचे ओरखडे का जपतो? का त्याला प्रत्येक वेळी उकरत राहतो. "इतकं सोप्पं नाही सगळं. तो अविश्वास असाच नाही निर्माण झाला. आणि म्हणून आता मी नाहीच विश्वास ठेवू शकत कुणावर आणि कशावरही, तुम्ही काहीही म्हणा."
आम्ही कशाला काहीही म्हणू? अनुभव तुझा होता, जखम तुला झाली आणि अविश्वासाला मनात घर तू करू दिलंस. आम्ही कशाला काही म्हणावे? पण जखमेवर इलाज होतो म्हणतोस आणि निशाणही राहू नये शरीरावर जखमांचे म्हणून एवढा प्रयत्न करतो आहेसच तर मग मनाच्याही जखमेची मलमपट्टी कर ना? जखमेतून अविश्वास तुझ्या वाट्याला आला. आता जरा जखमांना औषध लावून विश्वास मिळतो का बघ ना? हो रे! वागलेच ते तसे. कारण त्यांच्यातील काही जखमा त्यांनी मनात पाळून ठेवल्या आहेत. तुझ्याबद्दलची असूया असेल, इतरांनी दिलेले टक्के-टोणपे असतील, समाजाने कधीतरी त्याच्यावरही वार केलाच असेल. म्हणून ते त्याची भळभळणारी जखम उराशी कवटाळून बसले आणि तू विश्वास टाकूनही त्यांनी अविश्वासच दाखवला. मग तू दुखावला गेलास. रक्ताची नाती अशी कशी वागू शकतात, हा प्रश्न त्यांचे वागून झाल्यानंतर पडला ना? म्हणजे त्यांच्याबद्दल आधी विचार केला नाहीस तू? ते माझे आहेत आणि मी काहीही केले तरी त्याचे ते चुकीचे अर्थ लावणार नाही, हा समज (की गैरसमज?) तू का पाळलास मनात? खरंच कधी गृहीत धरलं होतंस का रे त्यांना? कारण तू जर का त्यांच्यावर इतका विश्वास टाकून जगत होतास तर तो विश्वास पोचला कसा नाही रे त्यांच्यापर्यंत? रक्ताची नाती आज जे काही वागताहेत त्याच्याही मागे कारण असेलंच ना? आणि त्या कारणांचा धनी तू ही असू शकतोस ना?
बरं, बरं… तुझी नाहीच काही चूक! मान्य. अगदी शंभर टक्के मान्य. पण त्यांच्या चुकांचा भार तू का रे वाहतो आहेस? त्यांच्या चुकीच्या धारणांमुळे तुला जखमा झाल्या आणि अविश्वासाचा जन्म झाला. पण त्यांच्या चुकीच्या वर्तनाची शिक्षा आणि सगळ्या खुणा तर तूच वाहतो आहेस? तुझ्या वागण्यात, बोलण्यात, जगण्यात अविश्वास रुजवून ते निघून गेलेत बघ पुढे. त्या बीजाला खतपाणी मात्र तू घालतो आहेस. त्या अविश्वासाने तुझे सारे मनोविश्व व्यापून टाकले आहे. तुला आता जिकडे तिकडे फक्त तो अविश्वास दिसतो. जेव्हा रक्ताची नातीच अविश्वास देतात तर इतरांना तर मोकळे रानंच! ते तर काहीही करू शकतात. कारण ते तुझे नाहीत. पण मग अश्या तुझ्या नसलेल्या कुणीतरी तुझ्यावर विश्वास टाकला भाबडा तर तू त्यालाही शिक्षा देणार अविश्वास दाखवून? इतका दुष्ट तू आहेस जन्मतःच? की तुझ्यात दुष्टपणाही त्या जखमा देणाऱ्या नात्यांचीच देण? मग तू तुझ्या गोष्टी वापरणार जगताना की इतरांनी तुझ्यावर मारलेल्या दगडांचे घर बांधून त्यात राहणार? जखमा पोसायाच्या का? की कात टाकून नव्याने जगायचे?
घे आता एक मोकळा ढाकळा मस्त श्वास. एका बेसावध क्षणी, तुझी काहीही चूक नसताना आणि तू स्वप्नातही अपेक्षा केली नव्हतीस तो अविश्वास तुझ्या आयुष्यात असा अचानक आला आणि उध्वस्त करून गेला तुला. अत्यंत वाईट झाले. पण आता आणखी एका शक्यतेचा विचार कर. असाच एखाद्या बेसावध क्षणी, तुला अजिबात म्हणजे अजिबात अपेक्षा नसताना आणि रक्ताच्या नात्यांनी दिलेल्या त्या भयंकर जखमांनंतर स्वप्नातही ज्याची अपेक्षा तू आता करत नाहीस तो विश्वास एक दिवस तुझ्या मनाच्या उघड्या कवाडातून आत आला तर?
त्याचे स्वागत कर. जखमांना बरं होण्यासाठी काही काल लागतो. तो तू घेच. पण व्रण राहू नये शरीरावर तसेच ते मनावरही राहू नये म्हणून काही करता येतं का बघ. इथे प्रश्न आहे धारणेचा. अविश्वास धारण करायचा की विश्वास? अर्थात, हळव्या मनांना रक्ताच्या नात्यातून मिळणाऱ्या जखमांचे जास्त दु:ख होते आणि अशी हळवी मनं कधीच अविश्वासासारख्या नकारात्मक गोष्टीला मनात जपत नाहीत. म्हणजे उत्तर सोप्पं आहे, नाही का?
वर्षा वेलणकर
No comments:
Post a Comment