अपेक्षांचे बाई भारी गुंते असतात. स्वेटर विणायला पूर्वी लोकरीचे वेढे मिळायचे आणि ते वेढे दोन मांड्यांमध्ये अडकवून त्याचा गोळा तयार करताना जसा वेढ्यातील गुंता सुटत जातो, तसे हे अपेक्षांचे गुंते सुटावे, असं मनापासून वाटतं. तसं हे विधानही जरा गुंतागुंतीच आहे म्हणा. थोडा हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करूयात.
आपण काहीतरी करतो स्वतःसाठी आणि मग ते सातत्याने करत राहण्याचा नियम मात्र करायला विसरतो. अनेकदा कारण असतं कि कुणाला काय फरक पडणार आहे आपण नाही हा नियम पाळला तर? पण तसं नाही. सभोवतालच्या गर्दीत कुणीतरी विनाकारण आपण नित्य नेमाने काही गोष्टी कराव्यात याची वाट पहात असतं.
म्हणजे आपण घराचा रिवाज म्हणून, किंवा घरातील थोरा-मोठ्यांनी केलेला नियम म्हणून काही गोष्टी करतो. नव्यानं लग्न होऊन घरात आलेली सून मग अशीच रोज अंगणात सडा घालते आणि आपल्या कलागुणांचे प्रदर्शन व्यवस्थित व्हावे म्हणून एक छानशी रांगोळीही घालते दारात. घरातल्यांसाठी त्यात कौतुकाचे काही शिल्लक राहत नाही. सांगितले ते केले आणि करते आहे हं नियमाने, एवढा एक प्रतिसाद मिळतो आणि मग तो शब्दात रोज व्यक्त करण्याची गरज संपते.
मन मात्र ते कौतुक, ते शब्द रोजच ऐकायला उत्सुक असतं. पण तसं होत नाही. घरातील नवीन व्यक्तीने घराचे नियम पाळावे ही एक अपेक्षा आणि ते नियम नित्य नेमाने पाळले जातात नव्या व्यक्तीकडून म्हणून त्याची दखल घेतली जावी, ही एक अपेक्षा. काय बरं असं मोठं बिकट यात आहे कि ज्यामुळे या दोन अपेक्षांच्या एकत्र येण्याने नात्यांमध्ये गुंता निर्माण होतो? नव्या व्यक्ती नियम पाळावे ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तरी गुंता होतो आणि ती पूर्ण झाली तरी गुंता होतो.
कारण एक अढी यात आहे. आणि ती म्हणजे पूर्ण आणि अपूर्ण राहणारी अपेक्षा ज्या एका कामाशी जोडलेली आहे ते आपण स्वतःच्या आनंदासाठी न करता फक्त नियमासाठी करतो. दारात सडा आणि छानशी रांगोळी हा घराचा नियम आहे, असे न मानता घराच्या प्रसन्न अस्तित्वासाठी त्याची गरज आहे, हे जर नव्याने घरात आलेल्या व्यक्तीला सांगितल्या गेले तर? आणि ती प्रसन्नता टिकविणे आता तुझ्या हाती, असं सांगितलं तर?
आणि घरात नव्याने आलेल्या व्यक्तीने ही, आपली हि कृती केवळ एक कर्तव्यभाव म्हणून पाहण्यापेक्षा आपल्या जगण्याचा एक घटक म्हणून स्वीकार केली तर? रोज श्वास घेऊन, खायला देऊन जिवंत ठेवले आहेस बाबा मला, म्हणून शरीर रोज धन्यवाद देतं बसतं? किंवा आपण तशी अपेक्षा ठेवावी? ज्या घरात आता आपण राहणार तिथली हि एक गोष्ट आता माझ्या जगण्याचा घटक आहे, असे मान्य केले तर त्या गोष्टीच्या पूर्ततेसाठी रोज आपल्याला कौतुकाची थाप मिळावी हि अपेक्षाही काही काळाने निमालेली दिसेल.
आता इथेच तर खरी गंमत आहे. ती असते दाराबाहेरची. घरातील लोक जे करतात त्याला नित्यनेमाने पाहणारे दारासमोरून जातात. हे अनोळखी लोक रोज दारातला सडा आणि ती मन प्रसन्न करणारी रांगोळी पाहतात. कौतुक त्यांच्या डोळ्यात असतं. पण आपल्यापर्यंत ते पोचत नाही. कारण आपण घरातल्या अपेक्षांच्या गुंत्यांत अडकलेलो. पण हे दारासमोरून रोज रांगोळी न्याहाळत जाणारेही एक अपेक्षा घेऊन जगू लागतात. या दारात कायम रांगोळी दिसणारच, ही गोष्ट त्यांनी त्यांच्या मनाला सांगितली असते. एक दिवस का सडा-रांगोळी दिसली नाही तर खट्टू मनाने ते दारापुढून जातात. असा कसा या घराने रोजचा नेम मोडला? त्यांचा अपेक्षाभंग होतो.
आता काही वेळेला अशी व्यक्ती कोण हे ठाऊक नसतं आपल्याला. किंवा ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोचतही नसेल. पण गृहीत धरायला हवंच का त्यांना? आवश्यक आहे ते? गृहीत धरायला हवंच का कि तुमची कुणीतरी वाट पहातंय? तुम्ही अंगणात सडा टाकून रांगोळी घालणारच, अशी अपेक्षा कुणाची तरी आहे. आणि तुमच्या दारासमोरून तुम्हाला स्वतःचा कुठलाही परिचय न देत तुमच्या सड्याची आणि रांगोळीची अपेक्षा करणारी व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाची ठरायला हवी? अशा अनोळखी व्यक्तीच्या अपेक्षांसाठी स्वतःला म्हणून नियम घालून घ्यावेत?
म्हणून म्हटलं, अपेक्षांचे बाई भारी गुंते असतात.
वर्षा वेलणकर