Friday, April 4, 2014

वृद्धाश्रम




वृद्धाश्रम 

बये, संपली बघ गोष्टं 
आता सांगण्यासारखे काही उरले नाही माझ्याजवळ 
तू विचारलेस म्हणून सांगते आहे 
संपलेल्या त्या गोष्टीत मी ही होते गं बये 
तुला दिसली का गं मी? 
गोष्टीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात होते मी 
माझ्या अस्तित्वाच्या दिव्यातील वात सावरत होते 
वातीच्या टोकाला पेटलेल्या अंगाराच्या जागी 
काळे काळे ठिपके चिकटले होते 
काजळी धरली होती 
तुला ही नाही दिसले का गं मी? 
तुला म्हणून सांगते, अगं माझीच गोष्टं होती ती 
रक्त संपलं गं देहातील 
मग वात जळणार कशी, सांग बघू?
आणि बये, विझल्या दिव्याला कुणी तुळशीजवळ ठेवतं का गं? 
माझं म्हणशील तर काजळी धरलीय वातीवर 
रक्तच नाही शरीरात, वातीला देऊ तरी काय?
बये, माझी गोष्टं मलाच ऐकवशील एकदा?
कुणीतरी वात पळवून नेण्यापूर्वी 
बये, माझी गोष्टं मलाच ऐकव ना गं एकदा! 

वर्षा वेलणकर 

1 comment:

  1. Very much on the emotional and philosophical side. Where do you get ideas of writing such beautiful poems???

    ReplyDelete