Sunday, March 30, 2014

काही बोलायाचे आहे…


बोलायचं असतं. प्रत्येकाला. कदाचित संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशीच. बोलायचं असतं. कधी थोडं, कधी खूप. कधी प्रेमाचं. कधी रागावून. कधी तिटकारा आला म्हणून सांगायचं असतं तर कधी भावलं बरं का मनाला, म्हणून सांगायचं असतं. कधी कधी तर, आज काहीच कसं बोलायला सुचत नाही आहे, हेच बोलायचं असतं. पण बोलायचं असतं प्रत्येकाला. 
माणसाला बोलता येतं आणि म्हणून तो समृद्ध होत गेला असावा. घशातून येणारे आवाज इतरांच्या समोर निघाले आणि त्यानंतर मिळालेली प्रतिक्रिया पाहूनच खूप खूप आवाज निर्माण करण्याची उर्मी जागृत झाली असावी. शब्द निर्माण झाले असावे आणि त्याचे अर्थही निश्चित होत गेले असावेत. आवाजाला शब्दाची आणि अर्थाची मिळालेली जोड माणसाला बोलतं करून गेली. असंच झालं असेल ना? तुम्हाला काय वाटतं? काहीतरी नक्कीच वाटत असणार. तुमच्याकडेही एक प्रतिक्रिया असणार. मग ती देण्यासाठी बोलते व्हा! 
बोला. आपण सारेच बोलण्यास उत्सुक आहोत. काही बाही सतत सांगण्याची आपल्यालाही हौस आहे आणि मी तर म्हणते जिवंत राहण्यासाठी जसे श्वास घेण्याची गरज असते ना तसेच जगण्यासाठी बोलण्याची गरज आहे. डोकं आणि विचार दिले आहेत निसर्गानं आणि म्हणून त्या डोक्यात येणारे विचार बोलून व्यक्त करण्याची गरज आहे. कारण डोकं बोलतं, मन बोलतं. आपल्याशी बोलतं. आपलंच आपल्याला सांगतं. 
डोळेही काहीतरी सांगतातच. डोळ्यांनी दिसणारे आवडले की न-आवडले ते शब्दात सांगण्याची गरज आहे. दारात आलेल्या माणसाचे स्वागत आहे की नाही, हे बोलून दाखवण्याची गरज आहे. आलेल्या व्यक्तीमुळे कुठे काही दुखावलं जाणार असेल तर जरूर बोलण्याची गरज आहे. आणि समजा आलेल्याच्या पावली प्रसन्नता, मांगल्य, आनंद, सुख, समाधान आलं असेल तर तेही बोलून दाखवण्याची गरज आहे. 
गरज आहे बोलण्याची आणि बोलायचंच आहे प्रत्येकाला. स्वतःच्या अनुभवांबद्दल - चांगल्या आणि वाईट दोन्हीबद्दल. शरीराला झालेल्या दुखापती बद्दल बोलायचं असतं आणि मनावर उठलेला ओरखडाही शब्दातून दाखवून द्यायचा असतो. उमललेल्या फुलासारखं मन बहरलं असेल तर तेव्हाही शब्दच येतात मदतीला आणि कधी त्याची कविता होते तर कधी एखादी कथा. इतरांना बोलतं करणारी ठरते ती. पुन्हा शब्दांचे धबधबे कोसळू लागतात. चिंब चिंब भिजवणारे आणि कधी कधी प्रवाहात ढकलून देणारे. पोहता येतं की नाही, हे ही कुणाला बोलून ठेवलेलं असेल तर बरं असतं. नसेल पोहता येत तर कुणीतरी मदतीचा हात तरी पुढे करणार ना! मदतीसाठी हाक मारायलाही बोलता यायला हवं. 
बोलता आलं पाहिजे प्रत्येकाला. ज्या समाजात जगतो त्याच्या उण्या-दुण्याबद्दल बोलता यावं. असं उणं-दुणं काढण्याची परवानगी समाजात आहे कि नाही, हे ही बोलून दाखवता यावं. अधिकारांची भाषाही कळायला हवी आणि जबाबदारीचा सूरही लावता यावा. शब्दांची जोड यालाही असतेच. योग्य शब्द निवडता यावे आणि ते कुठे आणि कसे वापरावे हेही मनाला आणि बुद्धीला बोलून दाखवता यावं. म्हणजे कंठालाही योग्य जोडीदार मिळाल्याचं समाधान मिळेल. 
बोलावं जरूर प्रत्येकानं. कारण नाही बोललं तर विचार डोक्याला भंडावून सोडतील आणि मग भंडावलेलं डोकं फुटण्याची पाळी येईल. म्हणून बोलावं माणसानं. भडभडा बोलून मोकळं व्हावं. कधी प्रत्यक्ष बोलावं. कधी फोन वरून बोलावं. कृतीतून बोलावं, इशाऱ्याने बोलावं, कवितेतून बोलावं, चित्रातून बोलावं, गाण्यातून बोलावं, स्वयंपाकातून बोलावं, मेंदीतून संवाद साधावा तर कधी रांगोळीतून व्यक्त व्हावं. 
आणि कधी कधी काहीच न बोलता शांतातेतूनही बोलावं… 
पण बोलावं. कारण बोलायचं असतं. प्रत्येकाला. संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी. 

वर्षा वेलणकर 

No comments:

Post a Comment