Sunday, February 9, 2014

माझ्या 'आदर्श' शिक्षिका

मार्च महिना आणि १९ तारीख!  माझा वाढदिवस आणि नेमका त्यादिवशी दहावी बोर्डाचा पेपर! मला अभ्यास आणि परीक्षांचा तिटकारा आहे. चोवीस वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच असलेल्या पेपरमुळे त्यात आणखी भर पडली होती. पण माझा तो वाढदिवस मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही ते एका व्यक्तीमुळे. माझ्या शिक्षिका रेखा फडणवीस यांच्यामुळे. पेपर सुरु होणार तेवढ्यात शाळेतल्याच एक इतर शिक्षिका आल्या आणि त्यांनी हातात एक कार्ड ठेवलं. शेकडो विद्यार्थिनी ज्यांच्या हाताखाली शिकून दरवर्षी निघून जातात त्या शिक्षकाने आपला वाढदिवस लक्षातच ठेवला नाही तर कार्डही पाठवावं, हे स्पेशल नाही का? मला आजही तो क्षण आठवतो आणि आठवतात माझ्या रेखा मॅडम. आणि हे सगळं स्पेशल यासाठी की मी स्पेशल नव्हते. मी कधीच एक खूप हुशार विद्यार्थिनी नव्हते. पण मला त्या अतीसामान्य असण्याच्या भावनेतून बाहेर काढून एक थोडंसं वेगळं आयुष्य जगायला शिकवलं ते रेखा मॅडम यांनी आणि म्हणून त्या माझ्या आयुष्यात कोरल्या गेल्या आहेत. 
घरी आई आणि शाळेतल्या बाई, एवढंच महत्वाचं असलेल्या वयाच्या टप्प्यावर मला रेखा मॅडम भेटल्या. खूप प्रसन्न चेहरा आणि कायम उत्साहाने प्रत्येक काम करणाऱ्या या मॅडम आमच्या प्रत्येकाच्या आवडीच्या होत्या. मग त्यांना फुलं आणणं आणि ते त्यांनी खूप हौसेनं केसात माळणं जितकं प्रेमळ होतं तितकंच त्यांचं विद्यार्थ्यांना हाताळणंही प्रेमळ होतं. पण त्यांनी कधी कुणाचे अवाजवी लाडही केले नाही. चुकांना त्यांच्याकडे माफी नव्हती. अभ्यासात कसूर केलेली त्यांना कधीच चाललं नाही. पण म्हणून त्यांनी कधी त्याचा खूप बाऊही केला नाही. वर्गात सगळ्यांना शिक्षा झाली आहे किव्वा जोरात ओरडून कुठली गोष्टं पटवून देण्याचा प्रयत्न त्या करताहेत असं कधीच झालं नाही. त्यांच्या विषयात चांगले मार्कं मिळावे ही धडपड त्यांनी त्यांच्या या विशेष स्वभावातून आमच्यात रुजवली. 
शाळा सुटली आणि वय वाढल्यावर आलेल्या जराश्या शहाणपणातून आता कळतंय की त्यांचा विषय होता एक चांगलं व्यक्तिमत्व घडवणं. खूप भव्य दिव्य काही करण्यापेक्षा फक्त एक चांगलं माणूस म्हणून आपले विद्यार्थी ओळखले जावेत, हे त्यांचं शिक्षण होतं आणि फक्त माझ्यासंदर्भात सांगायचं झालं तर ते आजही त्यांच्या हातून घडतंय. दहावी नंतर माझी शाळा सुटली पण मॅडमशी जुळलेली नाळ कायम राहीली. कॉलेजच्या अनिर्बंध वातावरणातही पाय जमिनीवर ठेवण्याचा संस्कार त्यांनी कधी रुजवला मला कळलंही नाही. नोकरी मिळाल्यानंतर ती करताना शंभर टक्के मेहनत करण्याची शिकवण त्यांनी शब्दातून नाही तर त्यांच्या स्वतःच्या कृतीतून पोचवली. काहीही अडचण आली आणि त्यांना ती पत्रातून कळवली की त्यांनी ती उत्तरातून सोडवली म्हणून समजा. ते ही सामान्यतः शिक्षक ज्या अधिकारानं सांगतात तसे नाहीच. त्यांच्यात आम्हाला एक मैत्रिण सापडली होती. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या भावनावेगांना समजून घेणारी, अंगी असलेल्या छोट्याश्या का होईना पण गुणांना प्रोत्साहन देऊन त्याचा आयुष्यात कुठे आणि कसा वापर करता येईल हे हळूच मनावर बिंबवणारी अशी ही वयानं, आदरानं मोठी असलेली मैत्रिण! वयाचा मोठेपणा आणि आदरयुक्त भीती त्यांनी आमच्या मनात निर्माण होऊ दिली नाही. एक आदर्श शिक्षक याहून वेगळा काय असणार! 
चोवीस वर्ष झालीत पण आजही मॅडमचं माझ्या आयुष्यातील स्थान कायम आहे. पत्रकारिता सोडल्यानंतर काहीतरी वेगळं करायचं डोक्यात होतं. मला मॅडमच्या रुपात मिळालेल्या मैत्रिणीमुळे आयुष्य सुकर करता आलं तशीच कुणाचीतरी आपणही मैत्रिण व्हावं, असा विचार आला आणि मॅडमने माझं तेही स्वप्न पूर्ण केलं. एका शतकपूर्ती करणाऱ्या शाळेत त्या मुख्याध्यापिका आहेत आणि तिथेच त्यांनी मला माझ्या छोट्या मैत्रिणींशी गप्पा करण्याची संधी दिली. पुन्हा मला शाळा अनुभवता आली आणि पुन्हा त्यांच्या आदर्श वर्तणुकीला जवळून पाहता आलं. त्यांचा प्रसन्न चेहरा आजही तितकाच प्रसन्न आहे आणि कामाचा उत्साहही. एक कुशल प्रशासक त्या आहेत मात्र त्यांच्या शिक्षकांच्या टीममध्ये खूप पॉपुलर आहेत. आजही त्या जे काही शिकवतात ते त्यांच्या कृतीतून. मग तो नीटनेटकेपणा असो की वाचनाची आवश्यकता. नवीन काही शिकण्याचा उत्साह असो किव्वा शिकवण्याची हौस. अशात त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाल्यानंतर झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. त्या आहेतच आदर्श शिक्षिका. फक्त आता त्यावर पुरस्काराची मोहर लागली आहे. 

वर्षा वेलणकर

5 comments:

  1. Some people do leave a lasting imression. We are doubly fortunate when we also have them egging us on all through. Good read..

    ReplyDelete
  2. Great Kaku. So peaceful write up! Enjoying some pearls from your treasure!!

    ReplyDelete
  3. We all are fortunate to have some Gurus like this in our lives....

    ReplyDelete
  4. She's a very nice person. How do I know? I was fortunate enough to have met her most admired teacher. A very influencing blog.

    ReplyDelete