Thursday, January 9, 2014

डायरीचे एक पान…


डायरीचे एक पान… 

जून २४, २०१२

पावसानं रात्री जोर धरला आहे…  अशात, डोळे मिटून फक्त पडून राहणं शक्य असतं? शक्य नाही… पहाटेपासूनच ढगांनी आसमंत आणि सारा परीसर झाकोळून टाकला आहे…  फक्त ओलावा घेऊन निसर्ग पुढ्यात उभा ठाकलेला… सतत एकच जाणीव… अजून खूप काही दडलंय आत आणि देर आहे ती  बरसायची… रात्र कदाचित त्यासाठीच राखून ठेवली गेली असेल… 
हॉटेलच्या खिडकीमागे दाट झाडी असल्यानं पावसाचा बरसण्याचा नूर आणि स्वर वेगळा आहे. त्यात पानांची सळसळ आणि झाडांमध्ये वाहत्या वाऱ्याचा आवाज…खिडकीचा पडदा बाजूला सारून जरा डोकावून पाहिलं तर अचानक झाडाची एक फांदी वाऱ्याच्या ओघात काळोखातून खिडकीकडे झेपावली. दचकायला झालं. निसर्गाच्या इतर रूपांचा आस्वाद घेताना आनंद होतो. मग रौद्र रूपाचं भय का वाटावं? प्रश्न…त्यात  झाडातून वाहणाऱ्या वाऱ्याचं घोंघावणं मिसळलं आणि 'भय' या शब्दाचं वजन आणखी गडद झाल्याचं जाणवलं. 
सगळीच सरमिसळ…थोडा उत्साह…थोडा आनंद…थोडं स्तिमित होणं…थोडा विचार आणि खूप सारा अविचारही…थोडं त्यात उदासलेपण देखील डोकावतं…इथे येतानाच पावसानं घाटात गाठलं. मान्सून जेमतेम सुरु झाला असताना डोंगराकडे धाव घेणं म्हणजेच पाऊस अंगावर झेलण्याची इच्छा अनावर होणं, नाही का? मग घाटातच त्यानं गाठलं तर आनंद होणारच! डोंगर माथ्याशी पोचेपर्यंत धूक्यात वाटही दिसेनाशी झाली. अपेक्षा होती तसाच मौसम… अमाप आनंद…पण गडद धुक्याची भीतीही दाटून आली मनात. सगळीच भावनांची सरमिसळ… 
थोडं शांत बसण्याचा प्रयत्न करतानाच अचानक वाऱ्याची झुळूक यावी तसे विचार छळतात. त्याला छळ तरी कसं म्हणायचं? डोकं आहे, बुद्धी आहे तर मग विचार येणारच ना! विचार छळतात असं म्हणणं किती नकारात्मक वाटतं! पण का? 'का'चा विचार केला तर लक्षात येतं, मनाविरुद्ध आहेत किंवा आलेल्या विचारातून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही म्हणून त्याचा त्रास होतो. मनाविरुद्ध आहेत खरे, आणि कदाचित अनुत्तरीतही असतील. पण म्हणून त्यांना वाईट म्हणायचं? पुन्हा एकप्रश्न. या प्रश्नांचा आता निकाल लावायलाच हवा. तात्विक किंवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जरा तत्वज्ञानाकडे जाणारा विचार केला तर मला वाटतं, का शोधायचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर? काय गरज आहे त्याची? राहिलं काहीतरी अनुत्तरीत तर बिघडतं का काही? 
दैनंदिन आयुष्याशी निगडीत असतील तर  प्रश्न सोडवायलाच हवे. गरजच आहे ती. त्यातही दैनंदिन आयुष्यात ज्या लोकांशी नाळ जुळली आहे त्यांच्यासाठीच्या प्रश्नांची उत्तरं मिळवायलाच हवी. नातं सुख घेऊन आलेलं असेल आणि तरीही त्याबाबत काही प्रश्न निर्माण झालेले असतील तर ते नातं आणखी समजून घेण्यासाठी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्याची गरज आहे. नात्यात तणाव निर्माण करणारा प्रश्न असेल तर मग तातडीनं सोडवावा. नाहीतर गुंता वाढतंच जाणार हे निश्चित. 
पण सगळीच सरमिसळ आहे खरी. त्याला गुंतागुंत म्हटलं तर ती प्राधान्यानं सोडवायला हवी. कारण काही गाठींची उकल फार फार आवश्यक असते. पण ती फक्त सरमिसळ असेल तर त्याचा हळुवार आनंद घेत प्रत्येक भावना आणखी खोलवर उतरून पाहण्याचा प्रयत्न व्हावा. डोंगरावरच्या या सुखद वातावरणात हा साक्षात्कार व्हावा, याहून समाधान देणारं काय असेल? 
खूप उंच आहे म्हणून वाहणाऱ्या ढगांना रोखण्याची ताकद डोंगरात आहे. इतकी उंची गाठली आहे त्यानं की ढगांनाही पायाशी लोळण घ्यायला लावतो तो. निसर्गातली सगळी सुबत्ता खेचून घेतली आहे त्यानं स्वतःकडे. पण सारंच काही त्याच्या मर्जी प्रमाणे नाही. त्याला संपूर्ण शरण जाणं आकाशानही सहज स्वीकारलेलं नाही. ढगांमध्ये डोंगरमाथे गुडूप होतातच ना! उंच उंच होण्यालाही शिक्षा असते का? वर आणि आणखी वर गेल्यावर आपलं अस्तित्वही कदाचित गुडूप होऊ शकतं, अशी मानसिक तयारी त्यालाही करावी लागत असेल, नाही? 
यशाची शिखरं पादाक्रांत करणाऱ्यांनाही हे असंच काहीसं अनुभवाव लागत असेल? तेही उंची गाठतात. सर्व प्रकारच्या ऐशोआरमाला पायाशी लोळण घ्यायला लावायची ताकद तेही मिळवतात. यशाबरोबर लोकप्रियताही येते. आणखी काय काय अनुभव घेत असेल अशी यशस्वी व्यक्ती? त्याच्या नशिबाचे भोग असतात तरी काय? सारं काही चांगलंच होतं का त्याच्या आयुष्यात? आणि तो हि सर्वार्थाने इतरांसाठी चांगलाच ठरतो का? 
डोक्यात प्रश्नांचे ढग दाटून आलेले आणि नजर खिळली आहे डोंगरावर. उंच डोंगरावर. 
एक वाऱ्याची झुळूक येते आणि ढगांच्या हातात हात घालून पुढे निघते. डोंगर दिसतो स्पष्ट. त्याच्या अंगाखांद्यावर खेळणारी छोटी-मोठी हिरवीगार झाडं दिसतात आणि दिसतात त्या डोंगरातील कपाऱ्या. सपाट, सरळ दरीत उतरणाऱ्या. डोंगरमाथा आणि त्याचं टोक आणि मग ती कपार. सरळ दरीत उतरणारी. 
डोंगर खुणावतात सामान्यांना. त्याचं सौंदर्य खिळवून टाकणारं असतं. म्हणूनच पावलं आपसूक तिकडे वळतात. स्वतःला रोखणं अशक्य असतं. पायाखालची वाट खेचत असते. पुढे, पुढे आणि आणखी पुढे. पार त्या शेवटच्या टोकापर्यंत. कपार नजरेच्या टप्प्यात नसते. असतं ते फक्त  सौंदर्य आणि इतर खूप काही. शिखारावरची सत्ता, मनाचं त्यावर अधिराज्य, भावनांचा बहर फक्त दिसतो. अशात फक्त पुढे पुढे चालण्याची उर्मी ढगांप्रमाणे दाटून येते. डोंगराचा शेवटचा टप्पा पादाक्रांत करायची उर्मी. स्वस्थ बसू देत नाही ती. मनाला आणि पायांनाही. पावसानं पायवाट निसरडी झालेली आहे आणि चिखलानं पाय फक्त माखलेच नाहीत तर काही ठिकाणी रुतून बसताहेत याचंही भान उरत नाही. फक्त त्या शेवटाची, त्या उंचीची ओढ लागली असते. 
शेवटी तो टप्पा दृष्टीपथात येतो. मनाची तिथे पोचण्याची ओढ पायांना वेग पुरवते. मन धावू लागतं आणि पाय त्याचं अनुकरण करतात. निसरड्या वाटेवर पाय ठरत नाहीत. पण वेगाला आवर घालणंही कठीण होऊन बसतं. फक्त आणखी काही पावलं आणि तो पहा आलाच शेवटचा टप्पा…श्वास फुललेला आणि पाय आसुसलेले…डोळ्यात आणि मनात अत्युच्यतेला स्पर्श करण्याचा आवेग…त्या अनुभवास आता फक्त काही क्षण उरलेले…अपेक्षांची पूर्तता करण्याची सर्व ताकद  मनात आणि मनातून पायांत आलेली…बस्स! हा आलाच तो क्षण!! आता तिथे पोचताच थांबायचं आणि फक्त आनंद लुटायचा. त्या टोकावर थांबायचं. डोळे सांगत असतात थांबायला. मनाला पटतं आणि पायांनाही कळलेलं असतं. पण पायाखालच्या वाटेला कसं कळणार हे सारं? पावसात चिंब भिजलेली, मनसोक्त न्हालेली ती आवरणार तरी कशी स्वतःला! पावलांना रोखण्याची जबाबदारी तिची नाही. ती फक्त पुढे नेणारी असते. मग ती जर कड्यापर्यंत जाणारी आणि तिथेच संपणारी असेल तरीही हा खुलासा तिच्या आधारानं चालणाऱ्याकडे करण्याची जबाबदारी तिची नाहीच. ती फक्त घेऊन जाणारी. तिच्या अंताशी चिखलानं माखलेल्या पायांना थांबता आलं नाही, आवरता आला नाही तर अशा पावलांच्या कडेलोटाची जबाबदारी तिची कशी? 
उंच डोंगर, हिरवागार साज, पावसाची मेहरबान नजर, घोंगावणारा वारा आणि मनातील भावनांची सरमिसळ! शिखराकडे कूच केलेल्या पावलांना हे सारं काही सांभाळता आलं पाहिजे. नाहितर…
धुक्यात एकतर काहीच स्पष्ट दिसत नाही आणि अशात भावनांची ही सरमिसळ… 

वर्षा वेलणकर 

1 comment:

  1. Bhavaninchi hi sarmisal bahutekana anubhavayala yete, pan kahi kahinach shabdat pakadta yete...........

    ReplyDelete