Sunday, December 29, 2013

___________

प्रिय निरंजन,

२२ ऑगस्ट… बरोबर चार महिने झालेत आणि अजूनही या तारखेनंतर जे काही घडले त्या घटनांवर मी माझी प्रतिक्रिया शोधते आहे. एकटीच घरात शांत बसले असताना दारावरची बेल वाजावी आणि दार उघडल्यावर थबकायला व्हावं. प्रचंड प्रकाश! इतका की जे काही त्यात उभं होतं ते काहीही दिसूच नये. साध्या आकृतीचाही अंदाज बांधता येऊ नये इतका प्रकाश! आणि काही क्षणातच त्या प्रकाशासकट सारं काही गुडूप व्हावं. मी अजूनही माझी  प्रतिक्रिया शोधते आहे.  
साधा ताप तर होता. पूर्वी काही शारीरिक त्रासांनी एक वर्षापूर्वी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली होती. पण त्याचं स्वरूप इतकं गंभीर असेल असं वाटलं नव्हतं. ताप तीन दिवस राहिला आणि चवथ्या दिवशीही जेव्हा उतरला नाही तेव्हा मात्र थोडं अस्वस्थ वाटलं. आम्हाला दोघांनाही. मग डॉक्टर आणि वेगवेगळ्या टेस्ट झाल्या. तुमच्या हाती फारसा वेळ नाही, लगेच हॉस्पिटलला भरती व्हा, हे त्याचं वाक्य ऐकून माझी प्रचंड चिडचिड झाली. पण काहीच पर्याय नव्हता. संध्याकाळ संपली होती. रात्र जनरल वार्ड मध्ये काढायची होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सगळ्या चाचण्या झाल्या आणि दुपारी माझी रवानगी थेट आसीयूमधेच झाली. ती रात्र खूप अस्वस्थतेत गेली. पण एक दोन दिवसात इथून नक्की सुटका होणार याची खात्री होती म्हणून एक प्रकारचा निश्चिंतपणा मनात होता. 
पण तसं झालं नाही. दुसऱ्यादिवशी जेव्हा एन्डोस्कोपीसाठी मला नेण्यात आलं त्यानंतर सगळं चित्रंच बदललं. मी बेशुद्ध झाले होते आणि शुद्ध आल्यावर मग कसलीशी ग्लानी होती. काहीच कळत नव्हतं. सारे जीवाभावाचे लोक जमले होते आणि मला मात्र कसलंच भान राहिलं नव्हतं. एकप्रकारच्या शांततेनं मनात ताबा घेतला होता आणि मी खूप खूप… मला नाही सांगता येत कि नेमकं त्यावेळी मनात काय घडत होतं. पण जे होतं ते अनाकलनीय होतं. जमिनीवरून अलगद उचलले जाण्यापासून ते प्रखर प्रकाशापर्यन्तचा तो प्रवास होता. त्यात जे दिसलं, मी पाहिलं, अनुभवलं ते व्यक्त करायला शब्द नाहीत माझ्याकडे. पण ते जे काही होतं  त्यानंतरची मी मात्र पूर्ण वेगळी आहे. 
सहा दिवस आयसीयु आणि नंतर सात दिवस मी हॉस्पिटलच्या खोलीत होते. शारीरिक जे काही घडलं होतं ते डॉक्टरांनी शब्दांत सांगितलं. उपचारासाठी जे काही करावं लागत होतं ते ही काहीवेळा सहनशक्तीची परीक्षा घेणारं होतं आणि मी ही डोळ्यात पाणी आणून आणि काहीवेळा कळवळून त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केलीच.घरी परत आल्यावर पुन्हा तीन आठवड्यांनी भरती व्हावं लागलं आणि मग एक ऑपरेशनहि झालं. त्रास झाला. माझ्यापेक्षाही माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना तो जास्त झाला. म्हणून मी जे झालं त्यावर अजूनही माझी प्रतिक्रिया शोधते आहे.
मला मागे वळून पाहायचे नाही. त्यामुळे माझ्या आजारपणासाठी काय जबाबदार होतं; मी की ज्या परिस्थितीत मी जगले ती; माझा स्वभाव की जगण्याची पद्धत की आणखी काही. मला या प्रश्नांची उत्तरच शोधायची नाहीत. पण जे झालं त्यानंतर मला आता काय वाटतं आहे, ते मात्र मी नमूद करणार आहे. जो त्रास झाला तो मी विसरू शकत नाही पण त्याच बरोबर मला एक मात्र जाणवतं आहे की त्याहीपेक्षा आणखी काही लक्षात राहण्यासारखं या पूर्ण आजारपणाच्या दिवसांमध्ये होतं.
परिस्थिती एक होती आणि तिला हाताळणारे अनेक होते. डॉक्टर, नर्सेस आणि नातेवाईक. प्रत्येकाचा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. पण त्यांच्या प्रत्येक कृतीची साक्षीदार फक्त मी एकटी होते. डॉक्टर आणि नर्सेसच्या कामाचा तो एक भाग होता, असं सहज म्हणता येईल. पण त्यातही रुटीनच्या पलीकडे जाणारे मला त्यांच्यात भेटले. माझ्या बिछान्याशी येउन उभ्या राहणाऱ्या माझ्या लोकांचे अव्यक्त प्रेम मला दिसले. फक्त काही दिवसांपूर्वी झालेल्या मैत्रीचं रुपांतर नात्यात होताना दिसलं. आणि आयुष्यभर सोबत करण्यासाठी ज्या व्यक्तीला मी निवडलं होतं त्यानं त्या ७२ तासात मला खेचून बाहेर आणण्यासाठी धरलेला हात दिसला.
चार महिने लोटले आहेत. काय लक्षात ठेवायला हवं मी? आणि कसं? जीव धोक्यात होता की तो वाचला, हे लक्षात ठेवू की तो वाचवण्यासाठी झटलेल्या लोकांना लक्षात ठेवू? टोचलेल्या सुया, शरीरावर कापल्याचा खुणा, डायलिसीस घेताना झालेला त्रास लक्षात ठेवू की हे सारं करणारे लोक मला जो धीर देत होते आणि सांभाळून घेत होते ते लक्षात ठेवू? बिछान्यात निपचित पडलेलं माझं शरीर लक्षात ठेवु की न कंटाळता आणि चेहऱ्यावरचं हसू मावळू न देता ते स्वच्छ करणारी ती नर्स आणि मावशी लक्षात ठेवू? आयसीयुतून मला रुममध्ये नेताना एक नर्स जवळ आली आणि म्हणाली, "अभी अपना खयाल रखनेका और इधर कभी वापस नाही आनेका." मी हे वाक्य नाही विसरू शकत.
खूप त्रास झाला. पण त्या त्रासात जे अनुभवाला आलं ते त्याहीपेक्षा खूप मोठं आणि महत्वाचं होतं, असं मला वाटतं. मी आजाराच्या गांभीर्याने खचून गेलेले नाही; घाबरलेले नाही; उद्विग्नताहि मनात आली नाही. तसेच सारं काही संपल्यानंतर मी सुटकेचा श्वासही सोडलेला नाही आणि आनंद व्यक्त करण्याचीही उर्मी आलेली नाही. संवेदनाहीन झाले आहे, हे हि मला मान्य नाही. एक निश्चित प्रतिक्रिया माझ्यातून आलेली नाही. पण शांतता मात्र भरून राहिली आहे मनात. ती शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. कदाचित आणखी काही दिवसांनी मला तेही शक्य होईल.
तू म्हणाला होतास की ब्लॉग लिहायला लागलीस कि पूर्ण बरी झालीस असं मी समजणार. म्हणून आज हा ब्लॉग फक्त तुझ्यासाठी.
वर्षाकाकू 

1 comment:

  1. Khup sunder-ritya vyakta kelyas tujhya bhavana.......i am very very glad ki tu purna bari hote aahes....manasik drushtya suddha lavkarach hoshil. You are a very strong girl. Take care always....

    ReplyDelete