दोन लोक जगत असतात आपल्यात. एक जो फक्त आपल्या घरापुरता विचार करतो आणि एक जो फक्त आपला विचार करतो. तुम्हाला हा सिक्वेन्स चुकला असे वाटेल. पण नाही, तसाच आहे. बरोबर. जन्माला आल्यावर ज्या लोकांमध्ये तो वावरतो तो आधी त्या लोकांचा विचार करतो. ते काय बोलतात, ते कसे वागतात, त्यांना काय वाटतं आणि त्यातही माझ्याबद्दल काय वाटतं हा विचारांच्या priority चा सिक्वेन्स असतो. आधी प्रतिक्रिया येताना दिसते. इतर जे करतात त्यावर प्रतिक्रिया. पण ती का आणि कशी येते याचा विचार त्या फक्त आपला विचार करणाऱ्या व्यक्तीला करण्याची इच्छा होणे हे गरजेचं असतानाही तो तसा विचार करताना कुणी आढळून येत नाही. असं का होत असावं?
माझ्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी मी स्वतः आहे आणि मग इतर सारं काही, हे सत्य खरंच समजायला कठीण आहे का? आणि मी जर केंद्रस्थानी आहे तर आधी मला स्वतःला तपासून, वेगवेगळ्या कसोट्यांवर पारखून, अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून मग व्यक्त व्हायला हवे, हे काम खरंच खूप कठीण आहे? साधं समीकरण आहे - इतरांच्या कृतीवर जर माझ्यातून प्रतिक्रिया उमटत असेल तर मग माझ्याही कृतीची परिणीती अशीच असणार ना? म्हणजे संतापून बोलले तर इतरही उत्तरादाखल संताप व्यक्त करतील, बरोबर? मग आनंद आणि समाधान व्यक्त करत गेले तर परतावाही आनंद आणि समाधानाचा असेल, नाही का?
आपल्या आत जगणाऱ्या दोन व्यक्तींच्या उभे राहण्याचा सिक्वेन्स बदलायला हवा. आधी माझा विचार म्हणजे स्वार्थी असणं नाही तर तेच सगळ्यात महत्वाचे आहे. जे इतरांकडून अपेक्षित आहे ते मिळवायचे असेल - या इतरांमध्ये समाज म्हणायचे आहे मला - तर आपल्याला आधी त्या सर्व अपेक्षांची पूर्तता स्वतःसाठी करावी लागेल. समाजाचा घटक म्हणून जर मला काही समाजाकडून हवं असेल तर आधी ते समाजाला देण्याची ताकद आणि कुवत मी माझ्यात निर्माण करायला हवी. मला कुणी समजून घेत नाही, माझी कदर करत नाही अशा तक्रारी करतानाची नकारात्मकता जर माझ्यात निर्माण होत असेल तर ती नकारात्मकता मी समाजाच्या ओंजळीत टाकते. त्याऐवजी, कुठल्याही अभिनिवेशाशिवाय, मी समाजाला ओळखते, त्याच्या चुकांची आणि चांगलेपणाची मला जाण आहे आणि ज्याचा मी ही एक घटक आहे त्या समाजाची ताकद आणि कुवत माझ्या ताकदीवर आणि कुवतीवर अवलंबून आहे हे ज्यादिवशी प्रत्येकाच्या मनात लख्ख उमगेल - उमलेल त्यादिवशी आपल्या आत जगणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये कुठलेही मतभेद, गैरसमज आणि गैरवर्तणूकीला स्थान राहणार नाही.
त्या आतल्या दोन लोकांच्या जगण्याच्या priority बदलण्याची गरज आहे. आणि मुख्य म्हणजे सजग होऊन जगण्याची गरज आहे. जाणीवा sharpen करण्याची गरज आहे. समरसून जगण्याची गरज आहे. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास नीट निरखून पाहत जगण्याची गरज आहे. खरंच खूप कठीण असतं का असं जगणं?
वर्षा वेलणकर