Saturday, May 25, 2013

मामाचा गाव

आयुष्यात काही गोष्टी अशा असतात कि त्या नाहीत म्हणून काही बिघडलेलं नसतं. पण त्या नाहीत याची जाणीव हळवं करते. एकदिवस पहाटे फिरायला गेले आणि त्यादिवशी वेगळा रस्ता खुणावत होता आणि मी माझ्या स्वभावाप्रमाणे तिकडे गेलेही. तसं  आता पुण्यात रिकामं असं काही सहसा दिसत नाही. पण पाषाण सारख्या भर वस्तीच्या आणि उंच इमारती भरपूर असलेल्या भागातही एक रिकामा प्लॉट दिसला. त्याच्या समोरच्या खडकाळ पायवाटेने मनाला भुरळ घातली. आणखी एक गोष्ट तिथे होती जी मला खेचत होती. त्या रिकाम्या प्लॉटवर असलेलं आंब्याचं एक झाड. त्या एका दर्शनानं क्षणात आयुष्यातील २५-३० वर्ष डोळ्यासमोर तरळून गेली. तसं या वर्षांमध्ये खूप काही होतं. पण ठळक असं काही होतं तर ते माझ्या मामाचं गाव आणि त्यांची आमराई! 


मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील हे एक गाव - वायगाव. हळदीच नाही. तशी इतर काही ओळखही नाही या गावाची. पण ते आमच्या मामाचं  गाव आहे. नागपूर ते हे गाव हा प्रवास अंगावर काटा आणणारा असायचा. पण तेव्हा त्याची पर्वा नव्हती. कदाचित तेव्हा शिक्षणाने आणि शहरात राहून अंगावर चढलेला माज नव्हता. म्हणून सुट्या लागल्या कि आई बरोबर मामाच्या गावाला जायला मिळणार याचा आनंद व्हायचा. वाड्यासारखे खूप मोठे घर, भरपूर नातलग आणि घरापासून काही अंतरावर असलेला मामाचं शेत आणि त्यातील विहीर आणि १०० आंब्याची झाडं! आता त्यातील कितीतरींची नावंहि आठवत नाही. पण खोबऱ्या, लाडू आणि लोणच्याचा आंबा आठवतो. त्यातील खोबऱ्या माझा सगळ्यात आवडता कारण तो कच्चा देखील त्याच्या नावाप्रमाणे होता. त्याला तिखट मीठ आणि जिरे पूड लावून खाणं पर्वणी असायची. म्हणून प्रत्येक उन्हाळा हवाहवासा वाटायचा कारण तेव्हा आम्हाला मामाकडे जायला मिळायचं. 

गावात बस थांबली कि मामा आणि मामेभाऊ घ्यायला यायचे. घरापर्यंत पोचेपर्यंत वाटेतच अर्ध्या गावाशी गप्पा व्हायच्या. शहरात राहणारी एक आपल्या गावातील मुलगी मुला-बाळांना घेऊन माहेरपणाला आली आहे याची वर्दी गावाला लगेच मिळायची. माझा आईचं  नाव मालती. तिला गावातल्या सगळ्या म्हाताऱ्या आज्या मोलाबाई म्हणतात. का ते ठाऊक नाही. पण हि लेक त्यांच्यासाठी किती मौल्यवान आहे हे त्यांनी घेतलेल्या नावापेक्षा त्या मारलेल्या हाकेत जास्त जाणवायचं. तेव्हा हे सगळ कळण्याची अक्कल नव्हती. पण आता मात्र ते कळलं आहे. आईचा लाड व्हायचाच. पण आमच्या चेहऱ्यावरून फिरणारे ते खरखरीत हात आणि त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यांवरील प्रेमळ भाव तेव्हा पेक्षा आता जास्त आठवतात. कदाचित ते गमावल्यानंतर हे सारं काही जाणवत असावं. आठवलं कि अस्वस्थ वाटतं. 

स्वागत जंगी असायचं. त्यात आम्ही शहरातून परीटघडीच वागणं-बोलणं घेऊन जायचो. त्याचं  कौतुक व्हायचं. पण सांगितला ना, तेव्हा अक्कल नव्हती म्हणून कळलं नाही. या कौतुकामुळे एक वाईट झालं. आपणही असं या शहरातील मुलांप्रमाणे व्हावं हि स्पर्धा आम्ही नकळत गावात नेली आणि त्याचाच परिणाम कि काय तिथली मुलं आता शिकून सवरून शहरांकडे धावत सुटली आहेत. त्यांनाही mall आणि branded कपड्यांची भुरळ पडली आहे. एक वेगळी lifestyle त्यांना हवी आहे. चूक काहीच नाही त्यात. पण गाव त्यांना नकोस झाला आहे. शहरातील चैन पूर्ण करण्यासाठी आणि हि lifestyle maintain करण्यासाठी त्यांनी आपल्या वडलोपार्जित शेतजमिनी अगदी सहज विक्रीस काढल्या आहेत. गावात तरुण कमी आणि फक्त म्हातारे जास्त दिसू लागले आहेत. अस का, म्हणून विचारायची सोय नाही कारण त्यावर मोठी चर्चा घडते आणि एक बोट आपल्याकडेही दाखवल्या जायील याची खात्री आहे. 

गेले तीन चार वर्ष मी हि तिकडे गेले नाही. पण आठवण येते. आणि म्हणूनच सुशिक्षिततेचा सगळा आव बाजूला सारून मी त्यादिवशी त्या आंब्याच्या झाडाकडे गेले आणि कुणाचीही परवानगी न मागता - ती द्यायला खरच कुणी नव्हत तिथे आणि अजूनही नाही - मी त्या झाडाच्या दोन कैऱ्या तोडल्या. हातातून निसटून गेलेलं  ते गाव त्या दोन कैऱ्यांमध्ये शोधण्याचा तो कदाचित एक चिमुकला प्रयत्न असावा.

वर्षा  वेलणकर     

3 comments:

  1. अप्रतिम!! अत्यंत आरपार पोचलं!

    ReplyDelete
  2. Minti, hi pratikriya Aai kadun aahe. Nuktach mi tila blog vachayala dila tila "khup aavadla" ase ti mhanali. Tichya maherchya aathavani tajya zalya, tila khup khup bar vatal. tichya kadun "Aashirvad"
    Aani malahi blog khup aavadala......
    Tai

    ReplyDelete