जागतिक पुस्तक दिवसानिमित्त...
तसे कुठलेही दिवस वगैरे पाळायचे हा प्रकारच मुळात मला कधी आवडला नाही. पण पूर्वी ते पाळायचे नाही, हा हट्ट असायचा आणि आता ते डोक्यातही येत नाही. पण आज जागतिक पुस्तक दिवस आहे हे पाहिलं आणि वाटलं कि आज काहीतरी लिहावं. कारण मला वाचायला आवडतं. खूप आवडतं. कदाचित प्रत्येकाला काहीतरी वेगळं हवं असतं आणि ते वेगळं काहीतरी पुस्तक आणि कथांमध्ये जितकं सहज मिळतं तितकं ते इतर वेळा शक्य नाही. खरं तर प्रत्येकाला परीकथा आवडतात आणि ती आपलीही असावी असा वाटतं. हा आभास पुस्तकातून नेहमी पूर्ण होताना लहानपणी तरी अगदी जाणवतोच. ते जे काही असेल नसेल, पण मला वाचायला आवडतं.
लहान होते तेव्हा घरमालकाच्या मुलाकडे एक aluminium ची पेटी होती आणि त्यात तो पुस्तकं ठेवायचा. जादूचा दिवा, काचेचा महाल, सोनेरी उडणारा घोडा, राजकन्या आणि पोपट अशी भरमसाठ पुस्तक तेव्हा त्यानं गोळा केली होती आणि ती आम्हाला वाचायला मिळायची. त्यानंतर चंपक, लोटपोट, चाचा चौधरी, फास्टर फेणे, शिवाजी महाराजांच्या गोष्टी असं ते वाचन विश्व विस्तारत गेलं. शाळेच्या वाचनालयाची ओळख पाचवीत असताना झाली आणि त्याच कारण होतं वाचन स्पर्धा. त्यात भाग घेतला आणि वाचनालयाच्या प्रेमात पडले. किती वाचलं हे नाही सांगता येत. नेमकं जे वाचलं ते सगळं योग्य होतं का, हेही निश्चित सांगता येणार नाही. शिवाय एक विशिष्ट विषय वाचला तो का, वगैरे प्रश्नही मला कधी सतावत नाही. ते हाती आलं ते आवडलं तर वाचत जायचं एवढा साधा हिशोब होता आणि त्याचा खूप खूप फायदा झाला. आनंद वाटतो कि नशीबवान होते हे सगळं काही वाचता आलं . देवळात गेले नाही इतक्यावेळा मी पुस्तकाच्या दुकानात जाते. आणि ते सारे कपाटातले रचलेले देव पाहिले कि होणारा आनंद अवर्णनीय असतो.
वाचलं म्हणून लिहायची सवय जडली आणि त्या सवयीमुळे नोकरी मिळाली. पण त्या नोकरीत लिहित असताना वाचायचं राहून गेलं. गेले चार वर्ष नोकरी सोडली आणि पुन्हा वाचन यज्ञ सुरु झाला. इतकं वाचतो आपण पण लक्षात राहून जाणारं फार कमी असतं. आज मला ठळक आठवतात अशी माझी आवडीची पुस्तकं म्हणजे मृत्यूंजय, खलिल जिब्रानचं The Prophet, ग्रेस याचं मितवा, रिचर्ड बाखचं जोनाथन livingstone सीगल, पु लची सगळी पुस्तकं, पाउलो कोएलोचं pilgrimage आणि द अल्केमिस्ट, त्यांची आत्मकथा. त्यांची तर सगळीच पुस्तकं मी वाचली आहेत. पण एका पुस्तकान मला गेले काही दिवस अक्षरशः झपाटलं आहे आणि ते म्हणजे अ टेल फॉर द टाइम बीइंग. एका जपानी-अमेरिकन लेखिकेनं - रुथ ओझेकी - लिहिलेलं हे पुस्तक फक्त अप्रतिम नाही पण खूप मनस्वी आहे. शिवाय ज्यांना कथा सांगण्याची आवड आहे - लिहून किव्वा प्रत्यक्ष - त्यांच्यासाठी तर हे एक आदर्श पुस्तक ठरेल कारण विषयाची गुंफण, कथेचा आवाका उत्कंठावर्धक पद्धतीनं सांगतानाच किती विषय एका कथेत हाताळता येतात हेही हे पुस्तक वाचताना कळत.
पुस्तकांची आवड असणाऱ्यांना जुनी, दुर्मिळ पुस्तकं कुठे मिळतील याची माहिती असणारा महाराष्ट्र टाइम्स मधला लेखही छान आहे. पण त्यात फक्त मुंबईच्या अशा दुकानांचा उल्लेख आहे. शक्य असेल तर प्रत्येकान त्यांच्या शहरातील अशा दुकानांची माहिती काढावी आणि शेअर करावी म्हणजे अनेकांना ते सोप जायील. पुण्यात अशी बरीच ठिकाणं आहेत. आज या दिवशी अशी दुकानं शोधून त्यांची यादी करायचा मी निश्चय करते. बघू किती लवकर शक्य होतं ते.
वर्षा वेलणकर
सहमत.... Same here. वाचतोय असं नाही तर ऐकतोय, इतकं सजीव वाटलं. पुढील ब्लॉगच्या प्रतीक्षेत!
ReplyDeletekadhi kadhi vatata ki thought reader asata na tar mag pratyek vichar aani manat umalanar vakya lihita aala asata...aanakhi sajiv aani agadi nirmal....without any interpretation and intervention...hmmm...thanks Niru...
ReplyDelete