खूप काही वाटतं आणि कायम वाटत राहतं. मला वाटतं म्हणून मी जे वाटतं ते करण्याचा प्रयत्न करते आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे मला वाटतं ते इतरांना कळवणे. पण कधी कधी असंही वाटतं कि कुणी तरी आपल्याला न सांगताही समजून घ्यावं. एक शब्दही न उच्चारता कुणी तरी एखाद्या पुस्तकाप्रमाणे आपल्याला वाचून काढावं. छे! अशा वाटण्याला काही अर्थ नसतो आणि ते कधीच पूर्ण होत नाही. पण वाटून घ्यायला काय हरकत आहे?
चार वर्षांपूर्वी जेव्हा मी या एका विचारावर खूप दिवस रेंगाळले तेव्हा लक्षात आलं कि हे वाटणं खूप खोल रुजलेलं आहे आणि त्याची सुरुवात मी शाळेत असताना झाली. खूप पाऊस पडतो आहे आणि जरी वर्गात बाई शिकवत असल्या तरी मला मात्र बाहेर पडणारा पाऊसच पाहायचा आहे, हे माझं वाटणं त्या शिक्षिकेला कळावं असं खूप प्रकर्षानं वाटलं. पण हे असं काही विचार करणं आणि ते प्रत्यक्षात येईल हि अपेक्षा करणं मूर्खपणाचं असतं हा साक्षात्कार व्हायला खूप वर्ष लागली. पण तेव्हा मला आणखी काहीतरी वाटलं. मला शाळेत परत जायची इच्छा झाली आणि मला त्या विद्यार्थिनींशी गप्पा माराव्याश्या वाटल्या. या वाटण्याचं काय झालं माहिती आहे? मी गेले परत शाळेत.
काही कारणाने मी माझी शाळा अजूनही गमावलेली नाही. माझ्यात माझी शाळा कायम आहे कारण तिथे जे काही मिळालं ते आजही माझी सोबत करतंय. पण शाळाही मला विसरली नाही. मला शिकवणाऱ्या काही शिक्षिका अजूनही आहेत तिथे आणि म्हणून मला पुन्हा परत जाता आलं. गेले आणि सांगितलं मला मुलींशी गप्पा करायच्या आहेत. कसल्या गप्पा? प्रश्न स्वाभाविक आहे आणि मला तो अपेक्षित होताच. म्हणून माझं उत्तरही तयार होतं . म्हटलं, त्यांच्या मनात जे सुरु असतं ना ते मी त्यांना बोलायला सांगणार आहे. अनेकांना मनातल्या मनात हसू आलं असेल. हेही स्वाभाविक होतं आणि मला अपेक्षितही. म्हणून पुन्हा माझं उत्तर तयार होतं. यावेळी प्रश्न नसतानाही. मी म्हणाले कि कुणाच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला मी काही अंतरज्ञानी नाही. पण मला जे मनापासून वाटतं ते कृतीत येतं आणि कुणास ठाऊक मी जाणून घेण्यात यशस्वी ठरेनही. मला परवानगी मिळाली. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिक्षिका आणि संस्थेचे संचालक यांचे मन:पुर्वक आभार.
आणि त्यानंतर सुरु झाल्या गप्पा. काही वर्षांपूर्वी मी ज्या स्थितीत होते तिथे आता या मुली होत्या आणि मी त्यांची ताई झाले होते. आणि या गप्पा इतक्या रंगल्या कि सलग दीड वर्ष आम्ही बोललो. खूप काही आणि सगळ्या विषयांवर अगदी मनसोक्त बोललो. कधी हसलो, रडलो, कधी गप्प बसलो आणि कधी गाणी म्हटली, नाचलो, हुंदडलो. मला जे कधीतरी वाटलं होतं ते मी फक्त त्यांना विचारला कि तुमच्या मनात काय सुरु आहे ते कुणाला तरी कळावं असं तुम्हाला वाटतं का आणि त्यांनी होकार भरला. नशीबानं मी माझ्या वाटण्यावर सतत विचार करत राहिले त्यामुळे त्याचं मन आणि वाटणं काय आहे हे जाणून घ्यायला मला वेळ लागला नाही. मी त्यांच्या वाटण्याला शब्द देत राहिले आणि त्यांनी मंजुरी दिली. कुणी जाणून घ्यावं इतकं छोटंसं काहीतरी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला मला आणि वाटलं माझं वाटणं सार्थ झालं.
आज हे सारं सांगावसं वाटलं कारण गेले काही महिने या गप्पांना खंड पडला आहे आणि मला वाटतं त्या पुन्हा सुरु व्हाव्यात. म्हणून मला वाटतं कि प्रत्येकानं स्वतःला जे वाटतं ते करावं. कधी कुठली अपेक्षा पूर्ण होइल कुणास ठाऊक!
वर्षा
छान, पण थोडक्यात वाटलं. अजून माहिती वाचायला आवडेल.
ReplyDeleteReporting habit...any story, 350 words and spl story 500...so this is the old habit...will try to provide some more in coming blogs...thanks Niru...actually, u r my inspiration for starting this blog writing...thanks...
ReplyDeleteThank you, Kaku!! :)
ReplyDeleteChhan vatal Minti vachun, AAilahi dila vachayala. Manat aalelya gosti vastavat karun baghanyache dhadas karanare farach kami asatat tyat tu aahes ... chhan vatat...
ReplyDelete