आठवणी जागवणं म्हणजे सुकलेल्या पानांवर पाण्याचा वर्षाव करण्यासारखा वाटतं. जे झालं त्यातील काहीच बदलणार नसतं आणि तरीहि त्याचा मागोवा घेणं म्हणजे सरून गेलेल्या वयाच्या शरीरावरील खुणा पुसण्याचा प्रयत्न करणं. पण आठवणी सोबत असतात. कायम. कधी वाऱ्याच्या झुळूकीसारख्या येतात. उन्हाळ्यात आल्या तर घाम वाळवत नाहीत पण सुखावून जातात. कडक हिवाळ्यात आल्या तर अंगावर काट फुलतो आणि काटे बोचरे असतात. पावसाळ्यात आठवणी म्हणजे काहीतरी वाहून नेणार नक्की. कधी शरीरातील गर्मी, कधी मनात साचलेला मळ आणि कधी कधी जे सगळ्यात प्रिय आहे तेच वाहून जातं; गमावल्याच दुःख मागे ठेवून.
आठवण दिसते. उन्हात तपातेल्या फरशीवर बदलीभर पाणी ओतलं कि काही वेळ खूप काही जाणवत राहतं - मातीच वास, थंडगार स्पर्श आणि थोडं गार वारही. पण पुन्हा फरशीवर कोरडेपणाचे तुकडे पडून ते वाढू लागतात तेव्हा वर्तमान आणि आठवण त्यात दिसतात. बादलीभर पाणी म्हणजे आठवण, तो क्षणभर आलेला थंडावा म्हणजे आठवण आणि ते कोरडेपणाचे भराभर वाढत जाणारे तुकडेही आठवणच होतात - थोडावेळ अनुभवलेल्या थंडाव्याची.
फोफावलेल्या वेलीवरची काही पानं वाळून सुकली तर त्यांना पाणी घालून उपयोग नसतो. आयुष्य पुढे पुढे जात आहे आणि कोवळी पानं जन्माला घालतानाच या आयुष्याच्या वेलीवर काही वृद्ध सुकलेली पानही दिसू लागली आहेत. काही घटना वाळल्या आहेत आता. पण त्याचं अस्तित्व नाही संपलं. कोरड्या झाल्यात त्या आणि आता तर निष्प्राणहि. पण दिसतात त्या नजरेला. पानं खुडून फेकून दिली तरीही जिथे उगवलं होतं ती खूण राहते फांदीवर तशीच. फेकून देतानाही सुकलेल्या पानाचा चुर्र आवाज होतो. काही आठवलं कि हे अस सगळ वाटतं. आठवण फांदीवर उगवली ती जागा, पानांचं वाढत जाणं, त्याचा आकार, रंग-रूप बदलणं आणि मग पिकून जाणं. सारा काही नजरेसमोर दिसतं. वाळलेलं पान खुडून टाकावं म्हणतात. पण खुडायला गेल तर सहज नाही तुटत ते. थोडा जीव असतो त्यात आणि म्हणून ते फांदीवर असतं. आणि ते असतं तोपर्यंत सारं काही असतं. आठवण असते - कधी प्रिय तर कधी अप्रिय, कधी हवी-हवीशी वाटणारी आणि मग नकोशी होत गेलेली, कधी आयुष्याच्या वेलीवर जीव ओतून जगवलेली आणि आता अगदी खुडून टाकावीशी वाटणारी.
पण निसर्गाचा नियम आहे म्हणतात. जे उगवलं ते जगतं आणि जातही. पान उगवतं, वाढतं, रंग बदलतं, पिकतं, वाळतं आणि एक दिवस खुडायची घाई केली नाही तर गळून पडतं. तुमचं लक्ष नसेल तर कुठलाही चूर्र आवाज न करता वाऱ्याच्या झुळुकीबरोबर कुठेतरी निघूनही जातं. मग वाटच पाहावी. काही आठवणींच्या पानगळीची .
वर्षा वेलणकर