आयुष्य सोपं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
मला खूप प्रश्न पडतात. पण एक दशक आधी पडायचे त्याहून प्रमाण जरा आताशा कमी झालंय. पण प्रश्न आहेत अजुनहि. जिवंत असण्याचं ते लक्षण आहे, अशी माझी ठाम समजूत आहे. हं …तर मुद्दा किव्वा प्रश्न असा कि आयुष्य किव्वा आपण त्याला जगण म्हणू या, ते सोप्प कसा करायचं. अर्थात मी जे काही आता लिहिणार ते फक्त माझ्यापुरत आहे आणि ते माझे वैयक्तिक विचार आहेत. पण जमाना शेयरिंगचा आहे म्हणून ते इथे देण्याची उर्मी थोपवणे जरा अवघड आहे.
हा प्रश्न पहिल्यांदा कधी पडला ते आता आठवत नाही. पण तो डोक्यात गेली कित्येक वर्ष ठाण मांडून आहे. त्याचा त्रास कधी झाला नाही. पण मला उत्तरं शोधायचं होतं आणि मी त्यासाठी काहीना काही प्रयत्न सतत केले. माझं जगण सोप्प करायचं तर मला ते इतरांपासून वेगळं करावं लागणार, हे या प्रश्नाच्या उत्तरातील पहिल उत्तर होतं. वेगळ म्हणजे स्वतंत्र! आता पुन्हा प्रश्न, माझ्यासाठी स्वातंत्र आणि त्याचा अर्थ काय? निव्वळ आर्थिक स्वातंत्र? कि मला वाटेल ते करता येण्याची संधी? कि माझे निर्णय मला घेण्याची मुभा? कि कुणीही माझ्या कुठल्याही कृतीसंदर्भात स्वतःकडे जबाबदारी न घेणे? म्हणजे मी केलेल्या चुकांची (समाजाच्या दृष्टीकोना तून असलेली चुक. मला ती चूक म्हणून मान्य असेलच असे नाही.) जबाबदारी फक्त आणि फक्त माझी. माझ्या कुटुंबातील कुणालाही त्याबद्दल दोष दिल्या जाऊ नये, असे स्वातंत्र मला अपेक्षित होते का? होते का, असं म्हणतेय कारण हि सगळी चर्चा माझ्यापुरती मी केली त्याला एक दशक उलटून गेल आहे.
खरं तर जे काही वर लिहिलं ते सगळं मला त्या स्वातंत्र्यात अपेक्षित होतं. आणि आहे ही. आर्थिक स्वातंत्र्यासाठी नोकरी करणे अपरिहार्य होतं. ती मिळवली आणि अठरा वर्ष केली. पण स्वतंत्र होताना कुणाचीही सोबत नको असाही माझा आग्रह होता. कारण मदत घेणे म्हणजे स्वातंत्र नाही, हे हि कुठेतरी डोक्यात होतं. मदत करणारा कुठलं डोमबल्याच एकट जगू देणार? मदतीची परतफेड करावीच लागणार न! मग कसलं स्वतंत्र होण? पण सोबत करणारा जर माझ्या विचारांशी सहमत असेल तर? सुदैवाने मला अशी सोबत मिळाली आहे.
मग माझं जगण खरच सोप्पं झालं का? प्रामाणिक पणे सांगायचं तर तो प्रश्नच मी माझ्या डोक्यातून डिलीट केला होता. आज हे सगळं असं पुन्हा समोर आलं कारण आज सकाळी मला साक्षात्कार झाला कि माझं जगण खूप साधं, सरळ आणी सोप्पं आहे. कारण मला आयुष्यात काय करायचं आहे ते पक्क ठाऊक आहे. त्याची दिशा ठरली आहे आणि आता तर त्यादिशेनं वाटचालही सुरु झाली आहे. कुठलाही साक्षात्कार खूप आनंददायी असतो आणि आनंद हा इतराशी शेयर केला तर तो आणखी वाढतो. म्हणून हा लिखाणाचा उपद्व्याप!
खरच आयुष्य सोप्पं असतं. फक्त एकदा स्वतःची झाडाझडती करावी लागते. कुठे काय आहे दडलेलं ते शोधावं लागतं. त्या गुप्त ताकदी चा अंदाज घेत काही निर्णय घ्या वे लागतात. आणि असं करताना जे स्वातंत्र आपल्या ला अपेक्षित आहे त्याचा पुरेपूर वापर करायचा असतो. वाटतंय का हे सगळं सोप्पं आहे? मला विचारलं तर मी हो म्हणणार. तुम्ही तुमचं उत्तर शोधा. शुभेच्छा!
वर्षा वेलणकर
No comments:
Post a Comment