दोन गोष्टी आयुष्यात खूप ऐकायला मिळतात. सूचना आणि प्रतिक्रिया. जे काही आपण करतो त्यासंदर्भात या सूचना आणि प्रतिक्रिया मिळतातच मिळतात. यातून कुणाचीही सुटका नाही. पूर्वी फक्त वयाने मोठे किव्वा जे ज्ञानाने मोठेपणा मिळवलेले होते त्यांनी केलेली सूचना पाळावी आणि स्वीकारावी असा प्रघात होता. केलेल्या कृतीवर असे मोठे लोक काय प्रतिक्रिया देतील याचीही उत्सुकता असायची आणि वचकही होता. पण त्याचा कदाचित अतिरेक झाला आहे आणि आता, हम भी पीछे नही, म्हणून प्रत्येक जण सूचना आणि प्रतिक्रिया देताना आढळून येतो. खरं सांगू का, मलाही आवडत नाही सूचना आणि प्रतिक्रिया. द्यायला आणि घ्यायलाही. एखाद्या वाहत्या नदीवर बांध घालण्यासारखं असतं ते.
कधी कधी जरा एखाद्या विचाराचा किस पाडला आणि त्याकडे निरखून पाहिल कि वाटतं तसं सारं कसं सोप होतं पण उगाच खूप complicated केल्या गेलं आहे. Action आणि reaction हे सगळं अगदी बरोबर आहे. पण जरा निरखून पहा, आपण प्रतिक्रियात्मक जगतो आहे. आणि सुचनानवर सुद्धा. लहा नपणी सूचना …. असं नाही तसं, हे योग्य आणि ते बरोबर किव्वा हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही आणि असंच खूप खूप आणि खूप काही. मग या सगळ्यावर आपण दिलेली प्रतिक्रिया म्हणजे कधी मान मोडून ऐकून घेणे नाहीतर बंडखोरी आणि त्यावर आणखी प्रतिक्रिया. एक वाक्य त्यात असतंच, हि आजकालची मुलं ना अगदी डोक्यावर बसली आहेत वगैरे वगैरे.
यावर एक प्रतिक्रिया नक्की येणार, कि मग काय मोठ्यांनी काही बोलूच नये? आणि प्रतिवाद काहीसा असा असेल, मग लहान्यानी काय फक्त ऐकायचंच का?
या दोन्ही टोकाच्या भूमिका आहेत आणि मुळात माझा मुद्दा काही वेगळाच आहे. म्हटलं ना कि action आणि reaction असणारंच. पण त्यात originality, ज्याला मी नैसर्गिक स्वभाव आणि असणं म्हणते, ते मात्र कुठल्या कुठे गुडूप होतं. प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीला एक व्यक्तिमत्व, सोप्या भाषेत ज्याला personality म्हणतात, ती असते. त्याचा मातीत म्हणजे जगात, वातावरणात रुजण्याचा आणि वाढण्याचा एक वेग असतो. त्याला मिळालेल्या वातावरणाचा आणि पोषक घटकांचाही त्यात वाटा असतो. माती कशी आहे, पाणी पुरेसं आहे कि नाही, ऊन, वारा बरोबर मिळतय कि नाही. हे सारं काही त्यात समाविष्ट असतं आणि त्यावर आधारित ते व्यक्तिमत्व घडतं. खरं तर सूचना आणि प्रतिक्रिया म्हणजेच खत-पाणी. पण कुणाला कुठलं खत आणि किती पाणी आवश्यक आहे यावर चिंतन खूप गरजेच आहे. ज्याला जे हवं ते आणि जितकं हवं तितकंच मिळावं. आणि यासाठी जो देतो आहे त्याला, ज्याला दिलं जात आहे त्याच्या नैसर्गिक स्वभावाची माहिती हवी. जो घेतो तो जर वयाने आणि बुद्धीने थोडा जाणकार असेल तर त्यानंही आपल्या गरजांना ओळखण्याची गरज आहे. काय हवं नको हे स्वतःला जोपर्यंत पुरेपूर कळत नाही तोपर्यंत उत्तर देण् याचा अधिकार मिळत नाही. मिळायला ही नको. पण तो अगदी खेचून घेतला जातोय, हा नवीन ट्रेंड आहे.
दोन व्यक्तिंमधली दरी जर वाढली आहे तर त्याला कारणीभूत हे आपलं परस्परांना न समजणं आहे. Originality काय आहे हे जर कळलं तर प्रश्न सगळे खल्लास होतात. कारण मग conflict राहत नाही ना, बरोबर? पण इतक सोपं नाही ते. Originality जाणून घेण्यासाठी थोडी मेहनत करावी लागते. Patience ठेवावं लागतं आणि हे कितीही गंभीर वाटत असल तरी त्यात असलेली जी मजा आहे ती लुटावी लागते. तेव्हा कुठे मग आपण आपल्यालाच दिसायला लागतो. पाणी खळाळलेलं असेल तर तळ दिसत नाही. पण शांत होण्याची वाट पाहिली कि सारं काही स्पष्ट दिसतं. मग नदीकाठावरची गम्मत आणि त्याच नदीची खोली पाहणं एक अलौकिक अनुभव ठरतो.
ग्रेस या कविबद्दल बोलताना महेश एलकुंचवार म्हणाले कि वाचकालाही काहीही वाचाण्यासाठीचा रियाज आवश्यक आहे. ग्रेस दुर्बोध वाटत असतील वाचताना तर तुमचा वाचनाचा रियाज कमी आहे हे कबुल करण्याची तयारी हवी. आजकालची मुलं आणि याचं काही कळत नाही असं जर वाटत असेल तर तुमचा त्यांना जाणून घ्यायचा रियाज कुठे कमी पडला ते पाहावं लागेल ना?
Just a thought....give a thought to it....
Varsha